लोकसत्ता वार्ताहर
पंढरपूर : राज्याच्या विधिमंडळाची पूर्वीसारखी प्रतिष्ठा राहिली नाही. लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी कुठल्या विषयावर बोलल्यावर आपणास प्रसिद्धी मिळेल याचा विचार करत चर्चा घडत असल्याची खंत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली.
शिंदे हे येथील विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारताच्या आणि राज्याच्या लोकशाहीमधील संसद आणि विधिमंडळ ही पवित्र मंदिरं आहेत. नागरिकांना त्यांचे प्रश्न सोडवणुकीची आस लागलेली असते. इथे त्यांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी कुठल्या विषयावर बोलल्यावर आपणास प्रसिद्धी मिळेल याचा विचार करत चर्चा घडत असते. या दोन्ही सभागृहांची पूर्वीची प्रतिष्ठा राहिली नाही असे लोकांच्या बोलण्यातून ऐकायला मिळते. त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी कायदे झाले पाहिजेत.
भविष्यात याचा स्तर उंचावण्याची जबाबदारी सर्वांची आहे असे ते म्हणाले. तसेच, समाज माध्यमांवर कुठल्या प्रकारच्या बातम्या चालतात. वाहिन्यांवर कशाची चर्चा होते. याचाच विचार करून सदस्यांकडून सभागृहात चर्चा केली जाते. कारण अशा विषयावर बोलल्यावर त्यांनाही प्रसिद्धी मिळते. मात्र यातून नागरिकांचे मूलभूत प्रश्न दुर्लक्षित राहतात अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.
कोणताही इतिहासातील प्रश्न हा त्या विषयातील जाणकारांच्या चर्चेतून सुटला पाहिजे. त्याकाळी झालेल्या अनेक घटना कशा झाल्या, का झाल्या, याबाबत चर्चा विनिमय झाले पाहिजे. थोर पुरुष आणि इतिहास यावर बेताल वक्तव्य करणे चुकीचे आहे. सध्या समाजमाध्यमावर लगेच यावर चर्चा घडतात. वास्तविक चर्चा करणारी माणसे त्या विषयातील तज्ज्ञ नसतात. परंतु यातून समाजात गोंधळ मात्र निर्माण होतो. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर बंधन घालण्यासाठी कायदा करावा लागेल असे राम शिंदे यांनी व्यक्त केले. या वेळी राम शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.
विकास काळाची गरज
विठ्ठल मंदिराजवळ शिंदे आणि होळकर घराण्यांचे पारंपरिक वाडे आहेत. हे वाडे विठ्ठल भक्तांच्या सुविधेसाठी तयार केले आहेत. प्रस्तावित पंढरपूर ‘कॉरिडॉर’ राबवताना या अशा इणारतींचे नुकसान टाळले जाईल. मात्र तरीही याचा काही भाग त्यात आल्यास येथे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा विकास होणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले.