संगमनेर : पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात काल सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जीव गेला. गेल्या काही दिवसांतील याच परिसरात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. दीड दोन महिन्यापूर्वी रान गव्याचा देखील अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता. महामार्ग बांधताना वन्यजीवांना जाण्या – येण्यासाठीचा भुयारी मार्ग न ठेवल्याने आजवर अनेक वन्य जीवांचा या महामार्गाने प्राण घेतला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, काल, मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्या पुणे नाशिक महामार्ग ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी महामार्गावरून एकामागे एक वेगाने वाहने जात होती. अशातच महामार्गावर आलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यानंतर बिबट्या तेथेच जागेवर कोसळला. रस्त्याच्या मधोमध बिबट्याचे धूड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग झाली. वाहनांतील प्रवासी आणि आजूबाजूचे लोक मृत बिबट्याला पाहण्यासाठी त्याभोवती गोळा झाले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. अखेर डोळासने पोलीस दूरक्षेत्राला अपघाता बाबतची माहिती कळविण्यात आली. पोलीस त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर बिबट्याचे धूड महामार्गातून बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरळीत झाली.

डोंगरदऱ्या, नद्यांचा परिसर, लपण्यासाठी आवश्यक असलेली ऊस शेती यामुळे संगमनेर तालुक्यात बिबट्यांसह अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे. पुणे नाशिक महामार्ग नव्याने बांधण्यात आला त्यावेळी वन्यजीवांना जाण्या येण्यासाठी भुयारी मार्गिका ठेवणे अत्यंत आवश्यक होते. परंतु तशी व्यवस्था न केल्याने आजवर अनेक वन्यजीवांचा वाहनांच्या धडकेत बळी गेला आहे. ज्यावेळी एखाद्या प्राण्याचा बळी जातो, तेव्हा पूर्वी झालेली चूक दुरुस्त करून महामार्गावर वन्यजीवांसाठी भुयारी मार्गिका कराव्यात अशी मागणी पुढे येते. परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे वाहनांच्या धडकेत वन्य जीवांचा बळी जाण्याच्या घटनाही थांबत नाहीत.

वन्यजीवांच्या दृष्टीने चंदनापुरी घाट परिसर हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. या भागातील पाण्याची मुबलक उपलब्धता, दाट जंगल या बाबी वन्यजीवांसाठी सुरक्षित निवारा असणाऱ्या आहेत. त्यामुळे या घाट परिसरात वन्यजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी याच ठिकाणी भर दिवसा महामार्ग ओलांडताना एका जीपच्या पुढच्या चाकांमध्ये बिबट्या अडकला होता. तेथील रेडिएटरच्या उष्णतेमुळे बिबट्याची कातडी सोलून निघाली होती. प्रवाशांनी ती घटना कॅमेऱ्यात कैदही केली होती. त्यावेळी हा बिबट्या तिथून निसटला, पण काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. अगदी अलीकडे, दीड दोन महिन्यांपूर्वी तालुक्यात सहसा न आढळणारा रानगवा वाट चुकून संगमनेर मध्ये आला होता. हाच महामार्ग ओलांडताना त्यालाही अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. अशा अनेक घटना घडवून देखील, महामार्ग प्राधिकरणाला जाग येत नाही. किमान चंदनापुरी घाट परिसर हा वन्यजीवांसाठी संवेदनशील भाग जाहीर करून तेथे तरी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे आजच्या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Story img Loader