वर्षभरातील दुसरी घटना; घटत्या संख्येमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता

नितीन बोंबाडे, लोकसत्ता 

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्ग ओलांडताना डहाणू तालुक्यातील महालक्ष्मीनजीक धानिवरी येथे कारची धडक लागून अपघातात बिबटय़ा दगावल्याची घटना मंगळवारी पहाटे सहा वाजता घडली. कासा वन परिक्षेत्र कार्यालयाजवळील केंद्रात बिबटय़ावर उत्तरीय तपासणीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती साहाय्यक वनसंरक्षक राहुल मराठे यांनी दिली.

उधवा वन परिक्षेत्र अंतर्गत धानिवरी रेंजमध्ये गुजरातकडे जाणाऱ्या वाहनाने बिबटय़ाला धडक दिली. यात रक्तस्राव होऊन बिबटय़ाचा मृत्यू झाल्याची माहिती मराठे यांनी दिली. याआधी, २० फेब्रुवारी २०१९ रोजी धानिवरी परिसरातच पाच वर्षांच्या बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. २९ जानेवारी २०१८ रोजी महामार्गानजीक उपलाट गावाजवळ वाहनाच्या धडकेत मादी बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. वर्षभरात डहाणू विभागात मानवी वस्तीत शिरलेले पाच बिबटे वन विभागाने जेरबंद केले आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तलासरी ते आच्छाड, हळदपाडा ते आंबोली आणि आंबोली ते सोमटा हे बिबटय़ाचे कॉरिडोर मार्ग आहेत. बिबटय़ाच्या संचारक्षेत्रातून महामार्ग गेल्याने त्यांच्या क्षेत्राचे विभाजन झाले आहे. अनेकदा महामार्ग ओलांडताना अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यात बिबटय़ांच्या संख्येत घट होऊ  लागली आहे. बिबटय़ा रोज ५ चौरस किलोमीटर परिसरात रात्रीच्या वेळी भ्रमण करीत असतो. जंगलात सुरक्षित क्षेत्र, शिकारीचा उभयरोधी पट्टा (बफर झोन) आणि मानवी वस्ती असे तीन भाग पाडले जातात. मानवी हस्तक्षेपामुळे जंगलातील उभयरोधी पट्टा नष्ट झाला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या चार महिन्यांचा काळ बिबटय़ाचा प्रजननाचा काळ समजला जातो. मादी बिबटय़ाला प्रजननाच्या काळात नर बिबटय़ा जंगलाच्या उभयरोधी पट्टय़ात शिकारीच्या शोधात असतात.

वैशिष्टय़े

तो मानवाची हालचाल टिपतो. परंतु ते समजत नाही. हे त्याचे वैशिष्टय़ आहे. एक बिबटय़ा मेला तर त्याची जागा नवीन बिबटय़ा घेतो. तो येतो कुठून हे कोणी सांगू शकत नाही. मात्र त्याला या परिसराची माहिती नसते तेव्हा तो दिसून येतो. बिबटय़ा सायंकाळी सहानंतर निघतात. ते पहाटेपर्यंत पाणी पिण्यापासून शिकार करण्यापर्यंत सर्व कामे करतात. बिबटय़ा हा नेहमी एकटय़ाने राहणे पसंत करतो.

पालघर जिल्ह्य़ातील बिबटय़ांचा पट्टा वाचविण्याची गरज आहे. तो पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बिबटय़ाच्या अस्तित्वासाठी वन कायद्यांचे पालन केले पाहिजे.

 -धवल कंसारा, अध्यक्ष वाइल्ड कॉन्झर्वेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन

Story img Loader