भद्रावती वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्र कचराळा येथील कक्ष क्र. २०४ येथे काल, १६ तारखेला पहाटे वाघ व बिबटय़ाच्या झालेल्या झुंजीत बिबटय़ाला आपला प्राण गमवावा लागला.
कचराळा नियत क्षेत्रातील वनरक्षक एम.एस.भोगेकर हे गुरुवारी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास या भागात गस्तीवर असतांना त्यांना ७ वर्षीय नर बिबट मृतावस्थेत आढळला. त्याच्या मानेवर, पाटीवर व पोटावर पंजाचे घाव आढळले. त्यामुळे बिबटय़ाचा मृत्यू वाघासोबत झालेल्या झुंजीत झाल्याचे स्पष्ट झाले.
हा नर बिबट या क्षेत्रात शिकारीच्या शोधात आला असावा. त्या ठिकाणी आधीपासूनच दबा धरून बसलेल्या वाघाने बिबटय़ावर हल्ला चढवला. ही घटना १६ तारखेला पहाटे घडली असावी, असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी एन.ई.मुंडे यांनी व्यक्त केला आहे. मृत बिबटय़ाचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकरी विजय बावणे यांनी केले. शवविच्छेदनानंतर बिबटय़ावर त्याच ठिकाणी दाहसंस्कार करण्यात आला. यावेळी चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, विभागीय वन अधिकारी एस.एस.पाटील, सहाय्यक वनरक्षक विवेक मोरे, भद्रावतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.ई.मुंडे, क्षेत्र सहाय्यक ए.एम.वैद्य, बिट वनरक्षक वरगंटीवार, इकोप्रोच बंडू धोतरे आदी उपस्थित होते.

Story img Loader