बागलाण तालुक्यातील देवळाणे शिवारात मांजरीचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडून बिबटय़ाचा मृत्यू झाला. कठडे नसलेल्या विहिरीतून बिबटय़ाचा मृतदेह बाहेर काढताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिकांना कसरत करावी लागली. देवळाणे शिवारात शंकर बुधा चव्हाण यांची शेती आहे. मंगळवारी कृषिपंप सुरू करण्यासाठी चव्हाण हे विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीत बिबटय़ा आणि मांजर मृतावस्थेत दिसले. त्यांनी ही माहिती परिसरातील शेतकऱ्यांना दिली. वन
विभागालाही याबाबत कळविण्यात आले.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कठडा नसलेल्या विहिरीतून बिबटय़ाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
कडे-कपाऱ्यांच्या या विहिरीतून बिबटय़ाला खाटेवरूनही काढता येत नव्हते. गावातील युवक सुरेश जाधव याने विहिरीत उतरून बिबटय़ाला खाटेवर ठेवण्यास वन विभागाला मदत केली. बिबटय़ाचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्यावर सुरेश वर येत असताना विहिरीचा काही भाग त्याच्या अंगावर कोसळल्याने तो जखमी झाला. त्याच्या एका पायाचे हाड मोडल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सटाणा येथे खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बिबटय़ा चार ते पाच दिवसांपूर्वी विहिरीत पडला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला.

Story img Loader