रत्नागिरी : तालुक्यातील गावडे आंबेर येथे भक्षाच्या शोधात वस्तीत आलेला बिबट्या एका विहिरीत पडला. या बिबट्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिवदान देत पुन्हा बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. गावडे आंबेरे पाटीलवाडी, रत्नागिरी येथील नीलेश मधुकर पाटील यांच्या घराच्या परसावनात घराच्या समोर असलेल्या भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. त्याबाबतची खबर सकाळी पावणे आठ वाजता पावस पोलीस ठाणे येथे देण्यात आली. खबर मिळताच विना विलंब वनविभागाची रेस्क्यू टीम पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाली.
वीस ते पंचवीस फुट खोल विहिरीत बिबट्या पडलेला आढळून आला. या विहिरीच्या पाण्याची पातळी सुमारे १७ ते १८ फुटावर असताना बिबट्या विहिरीत पाण्याच्या वर पायरीवर सुरक्षित बसलेला दिसून आला. वन विभागाच्या कर्मचा-यांनी पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा विहिरीत सोडून विहिरी वर सुरक्षेच्या दृष्टीने जाळी टाकुन बिबट्याला एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यामध्ये घेण्यास वनविभागाला यश आले. हा बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे ८ ते ९ वर्षे वयाचा असल्याचे पशुवैद्यकीय अधिका-यानी सांगितले. त्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
बिबट्याला विहिरितून बाहेर काढण्यास विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण ) गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी,न्हानू गावडे वनपाल पाली, प्रभू साबणे वनरक्षक रत्नागिरी, शर्वरी कदम वनरक्षक जाकादेवी यांनी कामगिरी केली.