नाशिक जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी बिबटय़ांचे दर्शन, तर कुठे बिबटय़ांकडून शेळ्या, मेंढय़ांचा फडशा पाडण्याचे प्रकार घडले असताना सटाणा तालुक्यातील तळवाडे (भामेर) येथे बिबटय़ाने अडीच वर्षांच्या बालकाचा बळी घेतल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत. नामदेव नामदास यांनी शनिवारी आपल्या मेंढय़ाचा कळप बिंदूमाधव गायकवाड यांच्या शेतात आणला होता. सायंकाळी मेंढय़ांच्या कळपाला सुरक्षित ठेवण्यासाठी चारही बाजूने जाळी ठोकून नामदेव हे पत्नी आणि मुलगा कोमल यांसह त्याच ठिकाणी झोपी गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रात्री एक वाजेच्या सुमारास आईच्या कुशीत झोपलेल्या कोमलचा किंचाळण्याचा आवाज झाला. बिबटय़ा कोमलला जबडय़ात पकडून ओढत असल्याचे नामदेव आणि त्यांच्या पत्नीस दिसून आले. त्यांनी आरडाओरड करताच आजूबाजूचे शेतकरी धावून आले. नामदेव यांनी बराच वेळ बिबटय़ाचा पाठलाग केला, परंतु तो सापडला नाही. रात्रभर परिसरातील शेतकऱ्यांनी शोधाशोध केली. जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या डागावरून रविवारी पहाटे पुन्हा शोध घेणे सुरू झाले. तब्बल एक किलोमीटरवर उसाच्या शेतात कोमलचं फक्त शीर आढळून आले. कोमलचा बिबटय़ाने बळी घेतल्याचे पाहताच नामदेव हे कोसळले. इतर शेतकऱ्यांनी त्यांना धीर देत सावरले.

काही जणांनी वन विभाग व जायखेडा पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, उपनिरीक्षक श्रीराम कोळी व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध यावेळी संताप व्यक्त केला. कित्येक दिवसांपासून तळवाडे परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या अंदाजानुसार बिबटय़ांची संख्या चार ते पाच आहे. याआधी शेळ्या, मेंढय़ा, घोडे बिबटय़ांनी फस्त केल्याचा त्यांचा दावा आहे. अनेक वेळा वन विभागाकडे  माहिती देऊनही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याची तक्रार मेंढपाळांनी केली आहे.