राजापुर तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये बिबट्याचा लोकवस्तीतील बिनधास्त वावराने लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला असल्याचे दिसत आहे. अशातच आता वडदहसोळ भागातील लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कैमे-यात कैद झाले आहे.
वडदहसोळ येथील ग्रामस्थ गिरीष म्हादये यांच्या घराच्या अंगणामध्ये गेले दोन दिवस बिबट्या रात्रीच्यावेळी आल्याचे त्यांच्या घर परिसरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये दिसून आले आहे. गेल्या काही वर्षापासून तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये बिबट्याचा राजरोस वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोवळ परिसरामध्ये सातत्याने गोठ्यामध्ये घुसून शेतकर्यांच्या पाळीव जनावरांना हल्ला करून बिबट्याने नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकवस्तीतील बिबट्याच्या या बिनधास्त वावराने सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण केली आहे. तर, दिवसाढवळ्या शेतशिवारामध्ये तसेच रात्रीच्यावेळी लोकवस्तीमध्ये बिनधास्त येवून पाळीव जनावरांना बिबट्याकडून हल्ला होवून नुकसान केले जात असल्याने शेतकरीही भयभीत झाला आहे. मात्र, बिबट्याचा अद्यापही बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. अशातच तालुक्यातील वडदहसोळ भागामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. सातत्याने रात्रीच्यावेळी लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात असताना वडदहसोळ येथील ग्रामस्थ म्हादये यांनी आपल्या घराच्या आवारामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये बिबट्या आल्याचे कैद झाले आहे. त्यामुळे या भादगावमध्ये बिबट्याचा वावर असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गिरीष म्हादये यांच्यासह ग्रामस्थांकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे.