अहिल्यानगरःवडनेर (ता. राहुरी) येथील शेतकऱ्याला ठार करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला. सध्या या बिबट्याला डिग्रस येथील नर्सरीमध्ये ठेवण्यात आले आहे. वरिष्ठांशी चर्चा करून नंतर त्याची रवानगी जुन्नर (पुणे) येथील बिबट्या निवारा केंद्रात केली जाणार असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिली.
दरम्यान या परिसरात आणखी ५ ते ६ बिबटे असून वन विभागाने बिबट्यांची शोध मोहीमाची सुरू ठेवावी, अशी मागणी वडनेर सेवा संस्थेचे अध्यक्ष किरण गव्हाणे यांनी वनविभागाकडे केली आहे. राहुरी तालुक्यात यापूर्वीही बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडलेली आहे. वडनेर येथील शोभाचंद गव्हाणे (५०) हे शेतकरी काल, सोमवारी पहाटे शेतात पिकास पाणी देण्यास गेले असता, बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून, त्यांना ठार मारले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीसह संताप व्यक्त केला जात होता. माजी आमदार प्राजक्ता तनपुरे यांनीही वन विभागासह केंद्र सरकारवर कडक ताशेरे ओढले होते.
याची गंभीर दखल घेत वनविभागाच्या ३० ते ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा वडनेर येथील गव्हाणे वस्तीसह विविध ठिकाणी पिंजरे लावून तैनात केला होता. स्थानिक ग्रामस्थांनीही त्यांना मदत केली. अखेर सोमवारी रात्री ११ च्या सुमारास बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कैद झालेला बिबट्या ५ ते ६ वर्षांचा आहे. त्याला सध्या डिग्रस येथील नर्सरीत ठेवण्यात आले आहे. नंतर त्याची रवानगी जुन्नर येथील बिबट्या निवारा केंद्रात केली जाणार आहे. वनविभागाच्या या शोध मोहिमेत सहायक वनसंरक्षक गणेश मिसाळ यांच्यासह राहुरीचे वनक्षेत्रपाल पाचारणे, वनपाल रायकर, सचिन शहाणे, शेडगे, खेमनर, गाडेकर, गिरी, घुगे, ससे, पठाण आदींचा सहभाग होता.