गोंदिया : मंगळवारी सकाळच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथील श्रीराम शेंडे यांच्या घरातील स्नानगृहात बिबटय़ाने आश्रय घेतला. अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबटय़ांचा वावर गावखेडय़ात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच नवेगावबांध येथील एका घरातून बिबटय़ाला जेरबंद करून जंगलात सोडण्यात आले होते, पुन्हा आज मंगळवारी सकाळच्या सुमारास तालुक्यातील बाक्टी येथील श्रीराम शेंडे यांच्या घरातील स्नानगृहात बिबटय़ाने आश्रय घेतला. सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास शेंडे यांच्या स्नानगृहात बिबट असल्याचे लक्षात येताच वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या बचाव पथकानेही वेळ न गमावता बाक्टीकडे धाव घेत बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल पाच तासांच्या परिश्रमानंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात आले.
गेल्या चार-पाच दिवसांपासून गावाभोवती असलेल्या उसाच्या शेतात व जंगलभागात बिबटय़ाचा वावर असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले होते. मात्र आज मंगळवारी सकाळच्या सुमारास तो बिबट जंगल सोडून गावातील शेंडे यांच्या घरातील स्नानगृहात असल्याचे कळताच गावातील नागरिकांची बघण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. प्रादेशिक वनविभाग नवेगावबांध व साकोली येथील चमूने सहाय्यक वनसरंक्षक डी.व्ही. राऊत, सदगीर यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्र अधिकारी रोशन दोनोडे, दर्शना पाटील, सहायक वनक्षेत्राधिकारी एल.के. सरकार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खोडस्कर यांच्या नेतृत्वात दुपारी १ वाजताच्या सुमारास त्या बिबटय़ाला जेरबंद करण्यात आले.