तालुक्यातील गरुडेश्वर शिवारातील एका दरवाजा नसलेल्या घरात शिरलेल्या बिबटय़ाला आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात वन विभाग आणि पोलिसांना यश आले. घरात कोणी वास्तव्य करत नसल्याने अनर्थ घडला नाही.दुष्काळी स्थितीमुळे सध्या ग्रामीण भागात बिबटय़ांचा मुक्त संचार सुरू आहे. उन्हाळ्यात पाणी व खाद्यासाठी ते नागरी वस्तीकडे धाव घेतात, असा अनुभव आहे. गरुडेश्वर गावात सोमवारी सकाळी बिबटय़ाने प्रवेश केला. या वेळी गावातील काही युवकांनी त्याला पिटाळले. बिबटय़ाने पांडुरंग कुंटे यांच्या नव्याने बांधकाम केलेल्या व दरवाजा नसलेल्या घरात प्रवेश केला. स्थानिक ग्रामस्थांनी दरवाजाजवळ बाभळी व बोराटीच्या काटेरी फांद्या लावून त्याला घरात जखडून ठेवले. दरम्यानच्या काळात याची माहिती वन विभाग व पोलिसांना देण्यात आली. बिबटय़ाची माहिती सर्वत्र पसरल्याने मोठी गर्दी जमा झाली. यामुळे बिबटय़ाला इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करण्यासाठी वन अधिकाऱ्यांना अडथळे आले. दुपारी दोनच्या सुमारास भिंतीच्या काही विटा काढून ‘ब्लो पाइप’द्वारे ‘इंजेक्शन’ मारण्यात आले. अर्धा ते पाऊण तासाच्या प्रयत्नांनंतर बिबटय़ा बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात टाकून नेण्यात आले. परिसरात आणखी काही बिबटय़ांचा वावर असून त्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा