सावंतवाडी : उष्णतेची लाट उसळली असल्याने पशु पक्षी पाणवठे शोधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राणी विहिरीत,कालव्यात कोसळल्याने वन विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. जंगलात पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात असलेल्या प्राण्यांना जीव गमवावे लागत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील बांदा गाळेल येथे कालव्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. मृतदेह कुजल्यामुळे तो दोन-तीन दिवसांपूर्वी त्या ठिकाणी पडला असावा, असा संशय आहे. ही घटना आज रविवारी सायंकाळी उघडकीस आली. पाण्याच्या शोधात असताना तो कालव्यात कोसळला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाचा कालवा गोवा व महाराष्ट्र सीमेवर आहे. त्या ठिकाणी गुरे चारण्यासाठी गेलेल्या काही लोकांना हा बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. घटनास्थळी वनपाल प्रमोद सावंत, अतुल पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी दाभिळ येथील डोंगराळ भागात पांडवकालीन जलकुंड सात बाय विहिरीत वाघिणीचा मृत्यू झाला होता. गवा रेडा बांदा येथे विहिरीत कोसळला तर निरवडे येथील शेत विहीरीत कोल्हा पडला होता.
जंगलात पाणवठे नसल्याने लोकवस्तीत वन्य प्राणी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. त्यातच ते विहीर, कालवा मध्ये कोसळत आहेत असे बोलले जात आहे. वन विभागाने जंगलात पाणवठे तयार केले तर वन्य प्राणी पाण्यासाठी वणवण भटकत राहणार नाही असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.