विरार पूर्वेच्या जंगलाला लागून असलेल्या कोपर गावात मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर वनविभागाने या भागात सापळा लावून बिबट्याला जेरबंद करण्यास यश मिळविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार पूर्वेच्या भागात जंगलाला लागूनच कोपर गाव आहे. या भागातही मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. या भागातील नागरिकांना आठवडाभरापूर्वी काही नागरिकांना बिबट्याचा वावर होत दिसून आले होते. त्यानंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याच्या भीतीने नागरिकांना जागरण करून पहारा द्यावा लागत होता.

बिबट्याच्या भीतीमुळे गावकऱ्यांना घराच्या बाहेर पडण्यासही अडचणी निर्माण होत होत्या. तर दोन दिवसांपूर्वी या भागातील चार पाळीव श्वानांचाही फडशा या बिबट्याने पाडल्याचे समजताच येथील वातावरण अधिक भयभीत झाले होते. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवी वनविभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी जागोजागी कॅमेरे लावले होते तर मंगळवारी या भागात पथके तैनात करून पिंजरा लावून सापळा लावण्यात आला होता.

बुधवारी पहाटेच्या सुमारास लावण्यात पिंजऱ्यात हा बिबट्या अडकून पडला. अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने मागील काही दिवसांपासून भीतीच्या सावटाखाली असलेल्या कोपर गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.