संगमनेर नगरपालिका कार्यालयाच्या आवारात घुसलेल्या दोघा बिबटय़ांनी रविवारी सायंकाळी शहरात थरार निर्माण केला. दोन्ही बिबटय़ांचा शोध रात्री उशिरापर्यंत वन व पोलीस विभागाचे कर्मचारी घेत होते.
पालिका कार्यालयाला रविवारी सुट्टी होती. मात्र, काही कर्मचारी आवारात उपस्थित असतानाच सायंकाळी पाचच्या सुमारास आवारातील कुटिर रुग्णालयाच्या बाजूला एका कर्मचाऱ्याला बिबटय़ा दिसला. त्याने घाबरून मोठय़ाने आरडाओरडा सुरू केला. तोच पाठीमागून दुसरा बिबटय़ाही पळत येताना दिल्याने त्याची बोबडीच वळाली. मात्र काही वेळातच हे दोन्ही बिबटे चार-पाच फूट उंचीची संरक्षक भिंत ओलांडून जाताना काही जणांना दिसले. या संरक्षक भिंतीमागे झाडी व त्यापुढे नदी आहे. सायंकाळनंतरच्या अंधारामुळे दोघे बिबटे नेमके कोठे आहेत, याचा अंदाज येत नव्हता.
ही वार्ता काही वेळातच शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली, कार्यालयाच्या द्वारापुढे मोठी गर्दी उसळली. वन व पोलीस विभागाला माहिती कळवण्यात आली, ते कर्मचारी लगेच आले. बिबटे आवारातच लपून बसले की पाठीमागील झाडीत पळून गेले याची शोध मोहीम सुरू होती.
संगमनेर पालिकेत बिबटय़ांची ‘सभा’
संगमनेर नगरपालिका कार्यालयाच्या आवारात घुसलेल्या दोघा बिबटय़ांनी रविवारी सायंकाळी शहरात थरार निर्माण केला.
First published on: 05-01-2015 at 02:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopards gather at sangamner panchayat