औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयाचा ‘चौकार’ लगावणाऱ्या शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या औरंगाबाद पूर्व, तसेच शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या औरंगाबाद मध्य या दोन विधानसभा मतदारसंघांत प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार नितीन पाटील यांच्यापेक्षा कमी मताधिक्य मिळाले. उर्वरित चारही विधानसभा क्षेत्रांत खैरेंनी दणक्यात मताधिक्य घेतले.
मनसेची साथ सोडून शिवसेनेत दाखल झालेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या कन्नड मतदारसंघात खैरेंना ९८ हजार ४८२, तर पाटील यांना ५६ हजार ९४६ मते मिळाली. दर्डाच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात खैरेंना ६८ हजार ५८२, तर पाटील यांना ७१ हजार ९४६ मते मिळाली. आमदार जैस्वाल यांच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात खैरेंची पिछाडी गेल्या वेळच्या तुलनेत कमी झाली, परंतु मोदी लाटेत या पिछाडीचे आघाडीत रुपांतर करण्यात अपयश आले. येथे दोन हजार मतांनी खैरे मागे पडले. या मतदारसंघात खैरेंना ७२ हजार ७९३, तर पाटील यांना ७४ हजार ६१९ मते मिळाली.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात खैरेंना ९३ हजार १६३, तर पाटील यांना ५७ हजार ३३५ मते मिळाली. अपक्ष आमदार प्रशांत बंब यांच्या गंगापूर मतदारसंघात खैरेंना ९१ हजार ९६४, तर पाटील यांना ५१ हजार ३५९ आणि सेना आमदार आर. एम. वाणी यांच्या वैजापूर मतदारसंघात खैरेंना ९५ हजार ६६५, तर पाटील यांना ४६ हजार ६०७ मते मिळाली. कन्नड, औरंगाबाद पश्चिम, गंगापूर व वैजापूर या चारही मतदारसंघांत खैरेंनी ९१ ते ९८ हजारांच्या पुढे मते घेतली. या ठिकाणी पाटील यांना ५८ हजारांपेक्षा कमी मते मिळाली. या मतदारसंघांतील मतांचा मोठा फरक खैरेंना विजयाची माळ चौथ्यांदा बहाल करणारा ठरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा