राज्यात चांगले दिवस येऊ देत, सततचा दुष्काळ, नसíगक आपत्ती यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. सर्वसामान्य जनता त्रासलीय, या त्रासातून मुक्त कर अशी प्रार्थना विठ्ठल रुक्मिणीकडे केल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. या एकादशीला वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जादुवाडी येथील दामोदर रतन सोमासे व लक्ष्मीबाई दामोदर सोमासे यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. दरम्यान एकादशी निमित्त पंढरीत जवळपास ५ लाखाहून अधिक भाविक दाखल झाले असून पंढरी नगरीत भक्तीचा मेळा भरलाय.
आषाढी एकादाशीला देवशयनीय एकादशी म्हटले जाते. या एकादशी नंतर पांडुरंग झोपी जातो, त्या नंतर चार महिन्यांनी म्हणजे काíतकी एकादशीला देव जागे होतात. म्हणून काíतकीएकादशीला प्रबोधनी एकादशी म्हटले जात असल्याचा उल्लेख पुराणात आहे. या काíतकी यात्रेला मुंबई,कोकण, कर्नाटक या सह राज्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतो. एकादशी दिवशी जवळपास ५ लाख भाविक पंढरीत दाखल झाला.
एकादशीला चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेतले जाते. त्या नंतर प्रदक्षिणा आणि विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. रविवारी पहाटेपासून भाविकांनी चंद्रभागेत स्नानासाठी गर्दी केली होती. मंदिर आणि परिसरात टाळ, मृदंग, खांद्यावर भगवी पताका आणि ग्यानबा तुकारामाच्या जयघोषाने पंढरी नगरीत भक्तिमय वातावरण दिसून आले. एकादशीला दर्शन रांग गोपाळपूर नाक्या जवळील पत्रा शेड येथे होती, तर दर्शनाला जवळपास १४ ते १५ तास लागत होते.
एकादशी निमित्त रविवारी पहाटे दीड वाजता नित्यपूजा, पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे दोन वाजता शासकीय महापूजा महसूलमंत्री एकनाथ खडसे दाम्पत्य आणि वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दामोदर रतन सोमासे आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई दामोदर सोमासे यांना मान मिळाला. दर्शन रांगेत जो भाविक पुढे असतो त्याला शासकीय महापूजेचा मान मिळतो. सोमासे दाम्पत्य गेल्या ५ वर्षांपासून पंढरपूरची वारी न चुकता करतात. व्यवसायाने शेती असलेल्या दामोदर सोमासे यांनी पूजा करायला मिळाल्याने जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस असून, सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना विठूरायापुढे केल्याचे सांगितले. या वेळी मंदिर समितीच्या वतीने सोमासे दाम्पत्याचा सत्कार केला. तसेच एसटी महामंडळाच्या वतीने सोमासेदाम्पत्य यांना एक वर्ष एस टीचा मोफत पास देण्यात आला. तसेच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचाही मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान, शनिवारी रात्री अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भाविकांसह व्यापाऱ्यांचीही तारांबळ उडाली.