अजित पवारांसह नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळेल असं आश्वासन नेत्यांना देण्यात आलं आहे. यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाची आस लावून बसले आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल, असा दावा शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत ते बोलत होते.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यामुळे मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी अनेक इच्छूक आमदार आतुर झाले आहेत, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, “मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आम्ही केव्हापासूनच तयार आहोत. फक्त फोन येऊ द्या, निरोप येऊ द्या, मग आम्ही निघालोच”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली. ते म्हणाले, “काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली असली तरीही अजून कोणताही निरोप आलेला नाही. पण लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आम्हाला असं वाटतंय की येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे”, असं भरत गोगावले म्हणाले.
हेही वाचा >> “तुम्हाला जे करायचंय ते करा, नंगे को…”, सदाभाऊ खोत यांचं शरद पवारांवर टीकास्र; ‘त्या’ विधानावर मांडली भूमिका!
तिन्ही पक्ष एकत्र चालू
गेल्या जून महिन्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले. तेव्हा राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. हिवाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन उलटल्यानंतरही अनेक नेते मंत्रिपदाची आस लावून बसले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आणि अजित पवारांसह नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यातच, रायगडमध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या आदिती तटकरे यांनाही मागून येऊन मंत्रिपद मिळाले, परंतु भरत गोगावले यांना अद्यापही मंत्रीपद दिलेले नाही. यावरून भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना भरत गोगावले म्हणाले की, “आदिती तटकरे यांना जे मंत्रिपद दिलंय ते त्यांच्या हिश्यातील दिलं आहे. आमच्या हिश्यातील दिलेलं नाही. आम्हाला का एवढा वेळ थांबवलं होतं हे आता कळलं. ते येणार होते म्हणून थांबवलं. ठिक आहे. राहिलेलं आहे ते आम्हाला देतील, आम्ही समाधान मानून घेऊ. हे राजकारण आहे, राजकारणात काय होईल हे आजच सांगता येणार नाही. तिन्ही पक्ष एकत्र घेऊन आम्ही चालू.”
हेही वाचा >> अखेर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा! सरन्यायाधीशांचा महत्त्वपूर्ण निर्णय
पालकमंत्री पद मलाच मिळणार
दरम्यान, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मलाच मिळणार असल्याचा दावाही भरत गोगावले यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांनी पालकमंत्रीपदाबाबत मान्य केलं आहे. त्यामुळे हे पद मलाच मिळेल, असा दावा भरत गोगावले यांनी केला.