रेल्वे अर्थसंकल्पाकडून कोल्हापूर जिल्ह्याबाबत मोठय़ा अपेक्षा होत्या. पण रेल्वे मंत्र्यांनी अपेक्षाभंग केला आहे, असा सूर जिल्ह्यातील खासदारद्वयींनी केला आहे. तर प्रवाशी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रवाशांच्या समस्यांची कसलीही दखल न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इरादा व्यक्त केला आहे.
मंगळवारी सादर होणा-या रेल्वे अंदाजपत्रकात करवीरनगरी रेल्वे विषयक प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास खासदार राजू शेट्टी व खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला होता. मात्र आज अर्थसंकल्प सादर झाल्यावर याबाबतची नाराजी शेट्टी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, रेल्वेने कोल्हापुरात येणा-या प्रवाशांची संख्या वाढत चालल्याने दुहेरी रेल्वे लाईन व विद्युतीकरण मंजूर करण्याचा निर्णय अंतरिम अर्थसंकल्पात घेण्यात आला होता.पण त्यास शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. कोल्हापूरची रेल्वे रत्नागिरी वा राजापूर या कोकणातील मार्गास जोडण्याचा सव्र्हे पूर्ण झाला असून त्यासाठी निधी मिळणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. अतिग्रे, जयसिंगपूर, हातकणंगले व भवानीनगर येथे ओव्हरब्रिज करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे.
केवळ कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रासाठी रेल्वे अंदाजपत्रक निराशाजनक असल्याचे मत महाडीक यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कोल्हापूर रेल्वेस्थानकाबाबत अनेक सुधारणा अपेक्षित होत्या. रेल्वे प्रशासनानेच पाठवलेले दोन प्रस्तावही दुर्लक्षित राहिले आहेत. ई-प्रणाली, खाजगीकरण यावर रेल्वे प्रशासनाचा भर दिसतो. पण या सुधारणा सामान्य माणसांच्यादृष्टीने फारशा उपयोगाच्या नाहीत. रेल्वे दरवाढ मागे घेऊन सामान्यांना दिलासा देण्याची अपेक्षाही दुरावली आहे. एकही नवी गाडी मंजूर न झाल्याने कोल्हापूरकरांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
रेल्वे प्रवाशी संघटनांनी रेल्वे बजेटची नाराजी लपवली नाही. रेल्वेचे निवृत्त अधिकारी मोहन शेटे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ बियाणी यांनी, अर्थसंकल्पाने प्रवाशांची घोर निराशा केल्याचे म्हटले आहे. एखादी शटल, हावडा वा अन्य एक्सप्रेस सुरू होईल असे वाटत होते. कोल्हापूरचे उत्पन्न वाढले असताना तेथे सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष का होते, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रलंबित मागण्यांसाठी लढा देण्याची गरज शेटे यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा