पुढच्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवण्याचा भाजपाचा विचार असून त्याच्या तयारीला लागावे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्रवक्त्यांपुढे केले होते. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. भाजपा त्यापैकी २४० जागेंवर जर निवडणूक लढणार असेल तर शिवसेनेचा शिंदे गट आणि मित्रपक्षांना केवळ ४८ जागा मिळतील.
बावनकुळेंच्या या वक्तव्यामुळे राज्यात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, सध्या सत्तेत सहभागी असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला किती जागा मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत टीव्ही ९ मराठीने बच्चू कडू यांना सवाल केला असता बच्चू कडू यांनी त्यावर स्पष्ट उत्तर दिलं.
युती होईल तेव्हा पाहू : बच्चू कडू
बच्चू कडू म्हणाले की, ते (जागावाटप) त्यांचं व्यक्तीगत आहे. आमची भाजपा-शिंदे गटाशी काही युती नाही. आमचा फक्त त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे जेव्हा युती होईल तेव्हा पाहू.
हे ही वाचा >> ४८ जागा लढवायला आम्ही मूर्ख आहोत का?, संजय शिरसाटांचा बावनकुळेंवर पलटवार
भाजपा २४० जागा लढवणार?
भाजपाच्या समाजमाध्यम विभागांचे प्रमुख आणि प्रवक्त्यांची मुंबईतल्या भाजपा प्रदेश कार्यालयात नुकतीच एक कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोपावेळी बावनकुळे यांनी सर्वांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. तसेच राज्यातल्या २८८ पैकी २४० जागा लढवण्याचे नियोजन केले.