महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक पाहण्यास मिळणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण अजित पवार हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपाला पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे. आमदार अण्णा बनसोडेंसह तीन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात ही चर्चा रंगली आहे ती न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीने. कारण अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याची बातमी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. असं घडलं तर राज्यात पुन्हा एकदा राजकीय नाट्य पाहण्यास मिळेल यात शंकाच नाही.
काय म्हटलं आहे या वृत्तात?
अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे. या ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. जर वेळ आली तर राज्यपालांना हे पत्र अजित पवार देतील. त्यामुळे सरकारला धोका निर्माण होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवलं तर हे पाऊल अजित पवार उचलतील. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल.
शरद पवार यांचं सूचक मौन
या सगळ्या घडामोडींवर आणि अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांवर शरद पवार यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एवढंच नाही तर शरद पवार यांनी जेव्हा अदाणींच्या संदर्भात जी भूमिका मांडली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. आता ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजितदादांकडे आहे हे वृत्त समोर आल्यानंतरही शरद पवार यांनी या सगळ्याबाबत सूचक मौन बाळगलं आहे. २०१९ मध्ये जेव्हा पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग झाला होता त्यावेळी शरद पवार यांनी सगळ्या आमदारांना परत बोलवत अजित पवार यांचं बंड मोडून काढलं होतं. आता राज्यात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
आमदार रवी राणांनी काय म्हटलं आहे?
अपक्ष आमदार रवी राणा यांनी हा दावा केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जेव्हा हिरवा कंदिल दाखवतील तेव्हा अजित पवार हे नॉट रिचेबल होतील आणि भाजपात जातील. रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवार जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य असेल असंही म्हटलं आहे. आता या सगळ्या बातमीमुळे नेमकं महाराष्ट्रात काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.