अलिबागमध्ये महिलेची हत्या केल्या प्रकरणी आरोपी गणेश शंकर म्हात्रे याला अलिबाग सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय न्यायालयाने दोषीला ११ हजार रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत परमानंद वाडी येथे १४ एप्रिल २०१८ रोजी घडली होती. भाग्यश्री पवार या महिलेची गळा आवळून हत्या करून तिचा मृतदेह कांदळवनात टाकून दिला होता. याप्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग मदतीने तपास करून या प्रकरणी आरोपी गणेश शंकर म्हात्रे राहणार कवाडे अलिबाग याला अटक केली होती.

दादर सागरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून अलिबाग सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी मुख्य जिल्हा सत्र न्यायाधिश विभा इंगळे यांच्या न्यायालया समोर झाली. यावेळी सरकारी अभियोक्ता म्हणून जिल्हा सरकारी वकील अॅड भूषण साळवी यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकूण २३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात तपासिक अंमलदार, वैद्यकीय अधिकारी, न्यायवैद्यक तज्ज्ञ यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. अभियोग पक्षाने सादर केलेले तांत्रिक पुरावेही न्यायालयाने ग्राह्य धरले.

दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला आणि आरोपी गणेश शंकर म्हात्रेला भादंवी कलम ३०२ आणि कलम २०१ अन्वये दोषी ठरविले. दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि १२ हजार रुपयांचा दंडही ठोठावला गेला.

दरम्यान, या गुन्‍ह्यातील आरोपी गणेश म्‍हात्रे याच्यावर यापूर्वी खूनाचा गुन्‍हा दाखल करण्यात आला होता. अलिबाग तालुक्‍यातील झिराडजवळ घोळकर वाडी येथे एक महिला व दोन लहान मुलींची अशीच गळा आवळून हत्‍या करण्‍यात आली होती. २००२ मधील या गुन्‍ह्याचा तपास करताना पोलिसांनी गणेश म्‍हात्रे याला अटक केली होती, मात्र पुरेशा पुराव्‍या अभावी त्‍याची निर्दोष सुटका झाली. यावेळी मात्र त्याला न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life imprisonment to convict of woman murder case in alibaug raigad pbs