ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अनंत आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यातच इंग्रजी आणि गणित या विषयांची धास्ती दूर व्हावी यासाठी कुणा तज्ज्ञाचे मार्गदर्शनही लाभत नाही. हे सगळं अनुभवल्यावर आपणच एक ‘विद्यापीठ’ काढावं ज्यात ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आकांक्षांची पूर्ती होऊ शकेल, असं स्वप्न पतंगराव कदम यांनी उरात बाळगलं. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं १८ वर्षांचं आणि खिशात होते अवघे ३८ रुपये!
डॉ. पतंगराव कदम यांचं मूळ गाव सोनसळ, शे-दीडशे उंबऱ्याच्या या गावात केवळ एकशिक्षकी शाळा आणि तीही चौथीपर्यंत होती. पुढील शिक्षणासाठी दहा ते १२ किलोमीटरची पायपीट रोजचीच ठरलेली. हे सारं पतंगरावांनी पार पाडलं. कशी तरी सातवीपर्यंत शाळा झाली. पुढे काय असा प्रश्न होता. याचवेळी कुंडलच्या वसतीगृहात राहून शिकण्याची व्यवस्था होऊ शकते ही माहिती मिळाली. घरच्यांनी तांबटकाकांच्या या वसतीगृहात शिक्षणासाठी ठेवले.
सोनसळला वस्ती झाल्यापासून पहिला मॅट्रिक होण्याचा बहुमान पतंगरावांनी पटकावला. याचवेळी किर्लोस्करवाडीच्या एका कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी, तरुणांनी स्वत: कमवून शिकावे, असा संदेश दिला. मग याच संदेशानुसार ‘कमवा आणि शिका’ या योजनेतून अर्धवेळ नोकरी करीत पतंगरावांनी पदवीचे शिक्षण घेतले.
शिक्षण कार्यासोबतच समाजकारणाचीही उपजत प्रेरणा होतीच. यातून राजकीय क्षेत्रात प्रवेश झाला. त्यातून एसटी महामंडळाचे सदस्यपद मिळाले. याचा लाभ घेत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. ‘गाव तेथे एसटी’ ही संकल्पना राबवण्यासाठी पुढाकार घेताला. त्याच जोडीने ‘भारती विद्यापीठा’च्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांचे जाळे विणण्याचे ठरविले.
बेधडक आणि खरे ते बोलण्याचे काही तोटे होतात. मात्र, पतंगरावांनी हा धोका कायम जोपासला. यामुळेच मुख्यमंत्रीपदाने अनेकदा हुलकावणी दिली तरी जे खाते वाटय़ाला येई त्यात वेगळे काहीतरी करून दाखवायची दिलदार वृत्तीही त्यांनी बाळगली होती. एरवी दुर्लक्षित असलेले वनखाते मिळाले तर त्याचाही फायदा सांगलीला करून दिला. देशातील सातवी वन अकादमी सुरू करण्यात त्यांचे प्रयत्न सत्कारणी लागले.
आज अंत्यसंस्कार
डॉ. कदम यांचे पार्थिव शनिवारी सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत पुण्यातील बीएमसीसी रस्त्यावरील सिंहगड बंगला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर धनकवडी येथील भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात सकाळी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्य़ातील वांगी येथील सोनसळ या गावातील सोनहिरा साखर कारखाना परिसरात दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदिंनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.