ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघ दाखविण्याची अक्षरश: जीवघेणी स्पर्धा सुरू झाली असून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे नियम डावलून पर्यटक, जिप्सी चालक व गाईडने वाघाला घेरून ठेवणे, ६० ते ७० च्या स्पीडने जिप्सी चालविणे, प्रतिबंधित क्षेत्रात जिप्सी घेऊन जाणे, पाणवठय़ांना घेरून ठेवणे, मचाणावर बसणे, आदी प्रकार खुलेआम सुरू आहेत. याची तक्रार वनमंत्री व प्रधान सचिवांकडे करण्यात आली आहे.
पट्टेदार वाघांसाठी प्रसिध्द असलेल्या या व्याघ्र प्रकल्पात वाघ बघण्यासाठी पर्यटकांची अक्षरश: गर्दी उसळली आहे. न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर अवघ्या पाच महिन्यात ताडोबाचे उत्पन्न एक कोटी रुपयावर झाले आहे. शनिवार, रविवार, तसेच इतर सुटीच्या दिवशी मोहुर्लीसह चार प्रवेशव्दाराहून किमान शंभर गाडय़ा सोडल्या जात आहे. ताडोबात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा मुख्य उद्देश वाघ बघणे हाच असतो. त्यामुळे प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना वाघ दाखविण्यासाठी गाईड व जिप्सी चालकांमध्ये अक्षरश: जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे नियम बघता प्रकल्पात ७० ते ६० कि.मी.च्या गतीने जिप्सी चालविणे गुन्हा आहे. मात्र, मोहुर्ली गेटमधून सकाळी ६ वाजता प्रवेश मिळताच तेलिया, ताडोबा तलावाच्या दिशेने जिप्सीचालक सुसाट वेगाने धावतात. एनटीसीएने व्याघ्र प्रकल्पासाठी २० कि.मी. चा वेग निर्धारित केला आहे. मात्र, या जिप्सी सुसाट पळतांना दिसतात.
ताडोबातील केवळ २० टक्के जंगल पर्यटकांसाठी सुरू आहे. वाघांचे अस्तित्व असलेले बहुतांश रस्ते बंद करण्यात आले आहेत. या सर्व रस्त्यांची माहिती जिप्सीचालक व गाईडला आहे. अतिरिक्त पैसे घ्या पण, वाघ दाखवाच, या पर्यटकांच्या अट्टाहासामुळे जिप्सीचालक व गाईड प्रतिबंधित क्षेत्रातही जिप्सी नेतात. जे रस्ते क्षेत्र संचालकांनी बंद करून ठेवले आहेत ते सुरू करून तेथे ते प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ हेच नाही, तर पट्टेदार वाघ दिसला तर त्या वाघाला जिप्सीने अक्षरश: घेरून ठेवतात. आठ दिवसापूर्वी एका स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यासमोरच पर्यटकांनी वाघाला अक्षरश: अर्धा ते पाऊण तास घेरून ठेवले होते. या प्रकारामुळे संतापलेल्या या एनजीओने गाईड व जिप्सीचालकाला अक्षरश: झापले. मात्र, त्यानंतरही हा प्रकार कित्येक वेळ सुरू होता. याची तक्रार वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नकवी, ताडोबाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र, या तक्रारीनंतरही हा प्रकार खुलेआम सुरू असल्याचे या एनजीओने लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.
एनटीसीएच्या नियमानुसार वाघापासून जिप्सी किंवा पर्यटकांची गाडी किमान ५० मीटर दूर अंतरावर असली पाहिजे. मात्र, येथे तर वाघाला अगदी चिपकून जिप्सी उभी केली जात आहे. केवळ अतिरिक्त पैसे कमावण्याच्या नादात गाईड व जिप्सीचालकांचा हा धिंगाणा सुरू आहे. विशेष म्हणजे, ताडोबात गाईड व जिप्सीचालकांवर नियंत्रण ठेवणारी कुठलीही यंत्रणा नाही. त्यामुळे एकदा प्रवेशव्दारातून जिप्सीने ताडोबाच्या कोअर झोनमध्ये प्रवेश केला की हा प्रकार सुरू होतो. जिप्सीचालक व गाईडवर मॉनिटरिंग करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशीही मागणी वन्यजीवप्रेमी व एनजीओने केली आहे. वाघ व बिबटय़ांना पर्यटकांचा हा त्रास सहन करावा लागत आहे. क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांच्यासह ताडोबातील सर्व अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. वाघाला घेरून ठेवण्याच्या घटना दरवर्षीच होतात. त्यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक सुरेश चोपणे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. दरवर्षी हा प्रकार होतो आणि तक्रारी झाल्या तर गाईडला काही दिवसासाठीच निलंबित केले जाते. गेल्या वर्षी दोन गाईडला अशाच पध्दतीने निलंबित करण्यात आले होते. मात्र, यावर्षी पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती बघायला मिळत असल्याची माहिती चोपणे यांनी दिली. केवळ अतिरिक्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोठी गाईड व जिप्सीचालकच वाघाच्या जीवावर उठल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे.

Story img Loader