Lifetime Membership for 99 Thousands for Panipuri Nagpur : चटपटीत, चटकदार, चविष्ट, तिखट-गोड असलेली पाणीपुरी कोणाला आवडत नाही? प्रत्येक शहरातील, विभागातील नाक्यावर एखादा चविष्ट पाणीपुरीचा स्टॉल असतोच. आठवड्यातून किंवा दोन दिवसांतून एकदा तरी या स्टॉलवरून पाणीपुरी खायची इच्छा होते. काहीजण तर नियमित पाणीपुरीचे चाहते असतात. शहरानुसार पाणीपुरीच्या किमती बदलत जातात. अगदी १५ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत एक प्लेट पाणीपुरीचे दर आकारले जातात. उच्चभ्रू वस्तीत यापेक्षाही अधिक दर असण्याची शक्यता आहे. पण याच पाणीपुरीसाठी कोणी जीवनभरासाठी सबस्क्रिप्शन दिल्याचं आठवतंय का? किंवा आठवड्याभराची, महिन्याभराची ऑफर देऊ केल्याचं माहितेय का? अशी हटके ऑफर नागपूरमध्ये एका पाणीपुरी विक्रेत्याने दिली आहे. त्याची ही ऑफर आता राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.
१५१ पाणीपुरी खाणाऱ्याना २१ हजारांचं बक्षीस
ऑरेंज सिटी म्हणून ओळख असलेल्या नागपूरमध्ये विजय मेवालाल गुप्ता यांचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे. या पाणीपुरी विक्रेत्याने ग्राहकांना आकर्षित करण्याकरता खास ऑफर्स देऊ केल्या आहेत. यामध्ये ९९ हजार रुपयांत आजन्म अनलिमिडेट पाणीपुरी खाण्याची ऑफर आहे. तर, जो कोणी एकाचवेळी १५१ पाणीपुरी खाईल, त्याला २१ हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय.
महाकुंभ आणि लाडकी बहीण योजनाही
याबाबत विजय गुप्ता म्हणाले, “आमच्याकडे एक रुपयापासून ९९ हजार रुपयांपर्यंत ऑफर्स आहेत. एक दिवसापासून लाईफटाईम ऑफर आहेत. १ रुपयाच्या ऑफरमध्ये आम्ही महाकुंभ ऑफर देतो. म्हणजे एखाद्या ग्राहकाने एकाचवेळी ४० पाणीपुरी खालल्या तर त्याला फक्त १ रुपयाच द्यायचा आहे. लाडकी बहीण योजनाही आमच्याकडे आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त ६० रुपयांत अनलिमिडेट पाणीपुरी खायला मिळणार आहे. तर इतरांना ९५ रुपयांत अनलिमिडेट पाणीपुरी मिळेल.”
महिन्याभरासाठी काय ऑफर?
“मासिक आणि आठवड्याची ऑफरही आमच्याकडे आहे. आठवड्याच्या ऑफरमध्ये ६०० रुपयांत तुम्ही पाणीपुरी, सेवपुरी किंवा भेळपुरी अनलिमिटेड खाऊ शकता. तर मासिक ऑफरमध्ये २००० रुपांत तुम्ही अनलिमिडेट पदार्थ खाऊ शकणार आहात”, असं पाणीपुरी विक्रेत्याने सांगितलं.
“लाईफटाईम ऑफरही आमच्याकडे आहे. ९९ हजारांत आम्ही लाईफटाईम ऑफर देतोय. आतापर्यंत दोघांनी ही ऑफर स्वीकारली आहे. आकाश शाहू आणि अमित श्रीवास यांनी ही ऑफर घेतली आहे. येत्या दोन तीन महिन्यांत आणखी ग्राहक ही ऑफर घेणार आहेत”, अशी माहितीही त्यांनी दिली.
“भविष्यात महागाई वाढणार आहे, त्यातून सुटका करण्यासाठी ही ऑफर देऊ केली आहे. भविष्यात पाणीपुरीसाठी वर्षाला ५ ते ७ लाखांचा खर्च होऊ शकतो. पण आम्ही ९९ हजारात लाईफटाईम मेंबरशीप देत आहोत. तसंच, फॅमिली मेंबरशीप घेणाऱ्यांना आम्ही १० टक्के डिस्काऊंटही देत आहोत”, अशा सवलतींचा पाऊसच या पाणीपुरी विक्रेत्याकडे आहे.