पाटण तालुक्यातील मारूल हवेलीत सिद्धेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून शेवटच्या सोमवापर्यंत नंदादीप लावण्याच्या परंपरेला दरवर्षी मोठीच झळाळी मिळत आहे. १९३६ मध्ये सुरू झालेल्या नंदादीप उत्सवाचे यंदा ७९ वे वर्ष असून, मान्यवर लोक प्रतिनिधींसह महाराष्ट्रातील सुमारे ७५ गावांतील शेकडो भाविकांचे  १३०० नंदादीप श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून रात्रंदिवस येथे तेवत ठेवले गेले आहेत. परंपरेने या उत्सवास वेगळे महत्त्व प्राप्त झाले असून, हा अनोखा दीपोत्सव पाहण्यासाठी लोकांची गर्दी राहिली आहे.
मारूल हवेली हे सधन आणि विविध क्षेत्रात आघाडीवर असलेले गाव आहे. प्राचीनकाळापासून इथल्या मराठमोळय़ा लोकांनी धार्मिकतेचा वसा जोपासला आहे. येथील सिद्धेश्वर मंदिरात प्रत्येक वर्षी शेकडो समई तेवत असतात. त्यात मारूल हवेलीचे सुपुत्र, माजी खासदार व सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी आमदार शंभूराज देसाई, विक्रमसिंह पाटणकर, टाटा मोटर्सचे कामगार प्रतिनिधी सुजित पाटील, वारणा उद्योग समूहाच्या शोभाताई कोरे आदी मान्यवरांच्या समयांचा समावेश आहे. उत्सवात पाटण तालुक्यासह पुणे, मुंबई, खोपोली, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह अनेक गावांतील भाविकांच्या समई येत असल्याचे दिसत आहे. या उत्सवाचा कालावधी श्रावण प्रतिपदा ते अमावस्या इथपर्यंत असतो. हा नंदादीप उत्सव राज्यभर प्रसिद्ध असून, नंदादीप उत्सवाचा भंडारा होऊन सांगता होईल. भंडाऱ्याला महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नंदादीप उत्सव समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा होत आहे.
सन १९३६ मध्ये (कै.) कृष्णा पाटील, कृष्णा मुकादम, कृष्णा सुतार, जीवाजी जाधव व सौदागर हिरवे या पाच ग्रामस्थांनी उत्सवास प्रारंभ केला. श्रावण मासात सिद्धेश्वर मंदिरात समई तेवत ठेवून एखाद्या नवसाची पूर्तता केली जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक श्रद्धाळूंनी नंदादीप उत्सवात व्यसने सोडल्याची उदाहरणे आहेत. हा उत्सव भाविकांचे मनोबल व सामथ्र्य वाढवितो अशी आख्यायिका आहे. गेल्या ७८ वर्षांत नवसपूर्ती होत असल्याने दिवसेंदिवस समईच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सुरुवातीला पाच समया होत्या. सध्या मंदिरात १३०० नंदादीप उजळत आहेत. हा दीपोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी नेटके नियोजन करून भक्तांना रांगेतून दर्शनाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी ग्रामस्थ आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत.  
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा