अलिबाग : देशाच्या हितासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. हीच भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप यांनी घेतली आहे. एकसंघत्वाचा विचार जर पक्ष मांडत असेल तर त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. देशाचे नेतृत्व करण्याची ताकद महाराष्ट्रात आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. श्रीवर्धन येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या श्रीवर्धन शाखेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, शिवसेना नेते अनंत गीते, माजी आमदार मुश्ताक अंतुले आदी उपस्थित होते.
देशात चुकीच्या प्रवृत्ती आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. समाजा- समाजात अंतर वाढवायचे, जात- धर्म यांच्यात कटुता वाढवायची, हा जाणीवपूर्वक कार्यक्रम काही घटक करतात. म्हणून या सर्वांना तोंड द्यायचे असेल तर समविचारी लोकांनी देशाच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्र योग्य रस्त्यावर गेला तर देशाला योग्य रस्ता दाखवण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र यायला हवे आणि जनतेने या सर्वांच्या पाठीशी उभे राहायला हवे, असेही पवार यांनी या वेळी म्हटले. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामाचे त्यांनी या वेळी कौतुक केले. मात्र या वेळी शरद पवार यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर बोलणे टाळले.
हेही वाचा >>> मराठा आरक्षण आंदोलन तीव्र; अंबादास दानवे, मुश्रीफ, मुंदडा यांना रोखले; प्रताप चिखलीकरांच्या वाहनावर दगडफेक
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान महाराष्ट्रात आले, पण मराठा आरक्षणावर बोलले नाहीत. सत्तर हजार कोटींचा उल्लेखही केला नाही. जिथे जातात तिथले मुद्दे घ्यायचे नाहीत, ही त्यांची सवय असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला. देशात शेतकऱ्यांसाठी सत्तर हजार कोटींची कर्जमाफी शरद पवार यांनीच केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
आमचे वाद होते, आम्ही एकमेकांविरोधात मारामाऱ्याही केल्या आहेत. मतभेद असले तरी व्यक्तिगत नव्हते; पण आज आम्ही देशहितासाठी एकत्र आलो आहोत. मीच करणार विरोधात हे समीकरण आहे.
छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने गद्दारांना टकमक टोक दाखवायचे तशी वेळ आली आहे. एका पक्षातून निवडून आलेले लोक बला आली की दुसरीकडे जात आहेत. या मातीत जर गद्दार जन्माला आला असेल आणि तो दिल्लीश्वरसमोर झुकत असेल तर त्याला सपाट करायची गरज आहे. त्यामुळे रायगडच्या गद्दारांना टकमक टोकावरून खाली ढकला, असे आवाहन त्यांनी केले. देशात नवीन राजकीय समीकरणे तयार होत आहेत. महत्त्वाच्या लढाईला सामोरे जायचे आहे. यासाठी मनाने सर्व जण एकत्र आलो आहोत. हा लढा नेटाने लढायचा आहे, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. यापूर्वी झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. गद्दारांचा बदला घ्यायचा आहे, असे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. जयंत पाटील यांनी अनंत गीते यांचा उल्लेख भावी खासदार असा केला.