मणिपूरमध्ये झालेल्या महिला अत्याचाराच्या व्हिडीओनंतर संपूर्ण देशभर खळबळ माजली आहे. संसदेपासून विधानभवनापर्यंत याचे पडसाद उमटले आहेत. त्यातच, मणिपूर हिंसाचाराचे खापर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर फोडण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही हल्लाबोल केला आहे. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर आगपाखड केली आहे. आज त्यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“महाराष्ट्र आणि केंद्र सरकार असंवेदनशील आहे. राज्यसभेत बोलताना स्मृती इराणी नळावर भांडणाऱ्या बायकांसारख्या वागल्या. आपले समाजसेवक सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अजिबात त्यांना जिव्हाळा नाही. त्यांचा अपमान हे सहन करू शकतात. महिलांचा अपमान हे सहन करू शकतात. त्यामुळे स्मृती इराणींसारख्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सावित्रींबाबत आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांवर हे सरकार कारवाई करू शकत नसतील तर त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे”, अशी ठाम मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

यशोमती ठाकूर यांनी ट्विटरद्वारेही संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, “महिला अत्याचाराच्या घटनांवर पक्षीय राजकारण करणाऱ्या स्मृती इराणी यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. मणिपूरच्या घटनेबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणी यांच्या मौनाबाबत प्रश्न विचारले. मणिपूरवर बोलणं टाळण्यासाठी आता भाजपाने अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राहुल गांधी यांना मणिपूरसाठी जबाबदार धरण्याचा कांगावा सुरू केला आहे.”

या तर चोराच्या उलट्या बोंबा

“काल महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी एखाद्या टीव्ही डिबेट किंवा पक्षाच्या सभेत असल्यासारख्या बोलल्या. त्यांचा राज्यसभेतील आवेश हा नळावरच्या भांडणासारखा होता. मणिपूरच्या घटनेवर बोलायची संवेदनशीलताही या सरकारमध्ये नाही. केंद्र सरकार संसदेत चर्चा करायला तयार नाही, या विषयावर राजकारण करायचं नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती, ईशान्येकडच्या राज्यांकडे विशेष लक्ष द्या असं राहुल गांधींनी सांगितलं होतं. मात्र सरकार आता राहुल गांधी यांना या बाबत दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतयं. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, आणि आम्ही या वृत्तीचा निषेध करतो”, असं त्या म्हणाल्या.

एनजीओला आर्थिक रसद पुरवणारे कोण?

“पंतप्रधान मोदींनी राजधर्म पाळला पाहिजे. संघ परिवाराशी संबंधित इंडिक टेल ही प्रपोगंडा साइट आहे. या साइटची मालकी सरयू या एनजीओकडे आहे. ही एनजीओ समाजात विष कालवणारा मोडका इतिहास पसरवत असते. सावित्रीबाईंवरच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर या वेबसाइटवर माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मात्र हा माफीनामा मान्य नाही. या एनजीओला आर्थिक रसद पुरवणारे कोण आहेत त्यांची नावे समोर आली पाहिजेत”, अशी टीकाही त्यांनी केली.

“खोटा इतिहास पेरणाऱ्या या साईटच्या ब्रेनला अटक झाली पाहिजे. संघपरिवाराशी संबंधित असल्याने कारवाईचं थातूरमातूर नाटक दाखवण्याचा प्रयत्न करून वेळ मारून नेली जात आहे. संघ परिवाराशी संबंधित अनेक संस्था आता सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्याबद्दल दुष्प्रचार करणारं साहित्य पुस्तिका रूपाने काढून व्हायरल करत आहेत. काही सोशल मीडिया हँडल्स त्यांना इंग्रजांचे हस्तक म्हणून प्रचार करत आहेत. फुले दाम्पत्याचं सामाजिक कार्य आभाळाएवढं आहे, त्यांनी वंचित घटक आणि सर्व जाती-धर्मातील महिलांना सन्मान दिला. आज आम्ही केवळ या दाम्पत्यामुळे इथे आहोत. अशावेळी त्यांचे योगदान नाकारणारी जी काही टोळी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, त्याचा मुखिया संघपरिवारच कसा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या लोकांवर तुम्ही कारवाई कराच, पण यामागचे ब्रेन ही समोर आले पाहिजेत”, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Like wives quarreling at the tap yashomati thakur got angry with smriti iranis sgk