राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेची विक्रमांच्या यादीत नोंद
रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. प्रतिष्ठानच्या वतीने १६ नोव्हेंबर २०१४ रोजी राज्यभरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची विक्रमांच्या यादीत नोंद केली आहे. एकाच दिवशी महाराष्ट्रातील २१ शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या या अभियानात ५ हजार ६४५ किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करण्यात आले होते. त्यातून सुमारे तीन टन कचरा गोळा करण्यात आला व त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती. या अभियानात राज्यभरातील २ लाख ५ हजार श्री सदस्य सहभागी झाले होते. एकाच वेळी लोकसहभागातून राबवण्यात आलेले हे पहिले महास्वच्छता अभियान होते. प्रतिष्ठानच्या वतीने या विक्रमाची नोंद घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. लिम्का बुक ऑफ रेकार्डसने तो स्वीकारला आणि २०१६ च्या विक्रमांच्या यादीत या महास्वच्छता अभियान म्हणून नोंद केली. निरूपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांच्या अनुयायांना अध्यात्मातून समाजसेवेचा मार्ग दाखवून दिला होता. यातूनच डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. त्यांच्या पश्चात डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाज सुधारणेचा हा वारसा पुढे सुरू ठेवला. प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, प्रौढशिक्षण अभियान आणि स्वच्छता अभियान यांसारखे उपक्रम राबविण्यात आले.
लोकांमध्ये जलसाक्षरता निर्माण व्हावी यासाठी धरण, तलाव यांची साफसफाई लोकसहभागातून करण्यात आली. गाळने भरलेले जलस्रोत स्वच्छ करण्यात आले. या वर्षी रायगड जिल्ह्यतील ५०० विहिरींची स्वच्छता करण्यात आली. प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमांची दखल घेऊन राज्यपाल विद्यासागर राव यांनी डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची राज्याचे स्वच्छतादूत म्हणून निवड केली होती. त्यानंतर अप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाच्या मोहिमेने चळवळीचे रूप घेतले होते.
याचाच एक भाग म्हणून १६ नोव्हेंबर २०१४ रोजी एकाच दिवशी महाराष्ट्रातील २१ शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वच वयोगटांतील स्वयंसेवक सकाळपासून मास्क, ग्लोव्हज् घालून स्वच्छतेसाठी लागणारी आवश्यक सामग्री घेऊन रस्त्यावर उतरले होते. या अभियानात ५ हजार ६४५ किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करण्यात आले. श्री सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबविलेल्या या यशस्वी स्वच्छता अभियानाची नोंद २०१ च्या ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. ‘लिम्का बुक’च्या ‘विकास’ (डेव्हलपमेंट) या भागातील रेकॉर्डमध्ये हे अभियान समाविष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader