सोलापूर : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू वाढत असताना उष्म्यापासून दिलासा मिळविण्यासाठी बाजारात थंड पेयांना मागणी वाढली आहे. त्यात लिंबाचा रुबाब वाढत असल्याचे दिसून येते. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बाजारात लिंबाचे दर दुपटीने वाढले आहेत. २० दिवसांपूर्वी प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर असलेला लिंबू आता १०० ते १२५ रुपये दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारात लिंबाचा दर प्रतिनग ७ ते १० रुपयांच्या घरात गेला आहे.
सोलापूरचा उन्हाळा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक तीव्र असतो. यंदा फेब्रुवारी महिन्यातच सोलापूरचे तापमान ४०-४१ अंश सेल्सिअसच्या पुढे सरकले होते. गेल्या मार्चपाठोपाठ चालू एप्रिल महिन्यात उष्मा दिवसेंदिवस वाढत आहे. उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी लिंबू सरबतासह फळांचा रस, आईस्क्रीम व इतर थंड पेये आणि खाद्यपदार्थांना मागणी वाढली आहे. विशेषतः घरोघरी दुपारच्या उन्हात लिंबाचे सरबत बनविले जाते. पाहुण्यांसह नातेवाईक आणि मित्रमंडळींना चहाऐवजी लिंबू सरबत देऊन पाहुणचार केला जात आहे. त्यामुळे बाजारात लिंबाचा भाव वधारला आहे. मंडई, आठवडे बाजार, इतर छोट्या बाजारांसह गल्लीबोळातील किराणा दुकानांत लिंबाला मागणी वाढली आहे. गेल्या फेब्रुवारीपासूनच बाजारात लिंबाचा भाव वधारला असताना चालू एप्रिल आणि पुढील मे महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता आणखी वाढण्याची चिन्हे असताना लिंबाचा दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाची आवक मागणीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या फेब्रुवारीत बाजार समितीमध्ये दररोज सरासरी ४० ते ५० क्विंटल लिंबू दाखल होत होता. त्या वेळी त्याचा दर प्रतिक्विंटल चार ते सात हजार रुपयांपर्यंत होता. परंतु आता लिंबाची आवक आणखी घटली असून, दररोज बाजार समितीमध्ये जेमतेम १८ ते २० क्विंटल एवढाच लिंबू दाखल होत आहे. त्याचा भावही तेवढ्याच प्रमाणात वाढत आहे. लिंबाचा प्रतिक्विंटल कमाल दर १२ हजार ६०० रुपये आणि सर्वसाधारण दर प्रतिक्विंटल ७००० रुपये इतका मिळत आहे.
पुढील आठवड्यापासून आवक वाढणार
यंदा सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या भागात लिंबाचे उत्पादन जास्त आहे. परंतु बागेतील लिंबू १० मार्च ते १० एप्रिलपर्यंत कमी प्रमाणात बाजारात येतो. पुढच्या आठवड्यापासून लिंबू मोठ्या प्रमाणावर बाजारात येण्याची अपेक्षा आहे. कर्नाटक, चेन्नई, हैदराबाद आदी भागांतील लिंबू सोलापुरात दाखल होऊ शकतो. आपल्या स्वतःच्या २० एकर क्षेत्रातील लिंबू बागेतील यंदा आतापर्यंत ३५ ते ४० टन लिंबू बाजारात गेला आहे. दर तुलनेने कमी असला, तरी समाधानकारक आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. पुढील महिनाभरात आणखी ४० टन लिंबू बाजारात येणार आहे. तेव्हा मात्र आजच्या एवढा दर मिळण्याची शक्यता नाही.- अण्णासाहेब बजरंग पवार, लिंबूउत्पादक, अंकोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर