लोकसत्ता वार्ताहर

अकोले : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मुळा नदीच्या काठावर असणाऱ्या लिंगदेव गावात लिंगेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला लिंगेश्वराची मोठी यात्रा भरते.त्या दिवशी साजरी होणारी संगित आखाडी हे या यात्रेचे मोठे आकर्षण.

या संगीत आखडीत अभियंते,डॉक्टर,पदवीधर असे उच्च शिक्षित तरुण सहभागी होत असतात.आखाडीत फक्त गावातील व्यक्तीलाच सोंग घेता येते.आखडीत सोंग नाचवायला मिळावं या साठी स्पर्धा असल्यामुळे सोंगांचा लिलाव केला जातो.या वर्षी या लिलावातून देवस्थानला १३ लाख ६३ हजार ५०० रुपये मिळाले असल्याची माहिती लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष दत्तात्रय फापाळे यांनी दिली.

आखडीच्या रूपाने लिंगदेव गावाने आपली सांस्कृतिक परंपरा टिकवून धरली आहे. दोन अडीचशे वर्षांपेक्षा अधिक परंपरा लाभलेली ही लिंगदेव ची संगित आखाडी बदलत्या काळातही आपला बाज टिकवून आहे.सायंकाळी सातला सुरू होणारी आखाडी सकाळी सात पर्यंत सुरू असते.

आखडीत रामायण,महाभारत तसेच पुराणातील पारंपरिक पात्रे घेऊन सोंगे नाचविली जातात.पारंपरिक वाद्यांची साथ त्यांना असते.गावात वास्तव्यास असणाऱ्या लोकांबरोबरच नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अन्य ठिकाणी असणारे भूमीपुत्रही आखडीत भाग घेतात. आखडीत जी सोंगे नाचविली जातात त्या सोंगांचा लिलाव होतो.भूमीपुत्रच त्यात सहभाग नोंदवू शकतात.भगवान लिंगेश्वर मंदिरात हा लिलाव पार पाडतो.या वर्षी झालेल्या लिलावात राज्याच्या विविध भागात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असणारे तरुण ऑन लाईन सुविधेमुळे आहे तेथूनच लिलावात सहभागी होऊ शकले

या वर्षी आखडीत जे गावातील युवक,भूमिपुत्र सोंगे नाचविणार आहेत त्यात राजकीय कार्यकर्ते,प्रगतिशील शेतकरी,व्यावसायिक,व्यापारी,देवस्थानचे विश्वस्त,डॉक्टर,पोलीस कर्मचारी, आदींचा समावेश आहे.अनेक अभियंतेही यात सहभागी होत आहे.

मच्छ अवतार , कच्छ अवतार , वराह अवतार ,राजा हिरण्य कश्यपु , नरसिंह अवतार , राम लक्ष्मण, शूर्पणखा, वाली सुग्रीव ,राम परशुराम , कुंभकर्ण , राम लक्ष्मण रावण, बकासुर ,भीम , यमराज ,सत्यवान सावित्री ,अर्जुन दुर्योधन,एकादशी ,कर्ण श्रीकृष्ण अर्जुन ,भीम दुर्योधन ,चंद्र सूर्य ,वीरभद्र रक्तादेवी ,भस्मासुर ,मोहिनी, वेताळ ,खंडेराय ,वाघ्या मुरळी, ,अभिमन्यु ,घटोत्कच आदी विविध सोंगांचे लिलाव या वेळी करण्यात आले. या संगीत आखाडीचे उदघाटनाचा मान युवा कार्यकर्ते हरिभाऊ फापाळे व राधाकिसन फापाळे यांनी साठ हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावून पटकाविला.

इंद्रजित च्या सोंगासाठी अभियंता असणाऱ्या व एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या अमोल फापाळे याने १ लाख ११ हजार रुपयांची बोली लावली.तर राजेंद्र हाडावळे यांनी रावणाच्या सोंगासाठी ७६ हजार ५०० रुपये मोजले.मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या भाऊसाहेब होलगीर यांनी राजा हिरण्यकश्यपू या सोंगासाठी ७५ हजार रुपयांची बोली लावली.प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे बोली लावत सोंगांची निवड केली .

लिंगदेवच्या या आखाडीचा लौकिक दिवसेंदिवस वाढत चालला आहे.पंचक्रोशी बरोबरच दूरवरून पर्यटक ही आखाडी पहायला येतात यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबरच लेझीम स्पर्धा कुस्तीचा हगामा यांचेही आयोजन करण्यात आले असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष फापाळे यांनी सांगितले. उज्वल इतिहासाबरोबरच अकोले तालुक्याला समृद्ध सांस्कृतिक वारसाही लाभलेला आहे. समृद्ध परंपरांचा वारसा सांगणाऱ्या या भूमितील यात्रा,जत्रा,उरूस,बोहाडा, आखाडी या सारखे लोकोत्सव याच संस्कृतीची प्रतीके आहेत.लिंगदेवची यात्रा त्या पैकीच एक.बदलत्या काळातही आपला बाज टिकवून ठेवणारी.