मध्य प्रदेशचा कित्ता गिरविणार
वाघांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असलेल्या मध्य प्रदेश वनखात्याने बंदिस्त वाघिणींना जंगलात सुखरूप सोडण्याचे दोन प्रयोग यशस्वी करून दाखवले. खरे तर या अभिमानास्पद प्रयोगाची मोहर महाराष्ट्र वनखात्याच्या नावावर पहिल्यांदा उमटली असती, पण अधिकाऱ्यांची नकारात्मकता भोवली. आता पुन्हा नव्याने नव्या चमूसह महाराष्ट्राचे वनखाते या प्रयोगासाठी सज्ज झाले आहे.
मध्य प्रदेश वनखात्यातही पिंजऱ्यातील वाघिणीला मुक्त करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी तातडीने निर्णय घेतले. पहिल्याच प्रयोगात वाघिणीला जंगलात सोडल्यानंतर तब्बल आठ महिने तिला शिकारच करता आली नाही, पण मध्य प्रदेश वनखात्याने हार मानली नाही. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि वाघीण शिकारीला सरावली. दुसऱ्या वाघिणीने जंगलात मुक्त होताच शिकारीला सुरुवात केली. या वाघिणीने आता बछडय़ांनाही जन्म दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील धाबा वनपरिक्षेत्रातून सुमारे सहा वषार्ंपूर्वी वाघिणीच्या शिकारीनंतर तिच्या तीन बछडय़ांना बोर अभयारण्यात स्थानांतरित करण्यात आले. त्यांना पिंजऱ्यात बंदिस्त न करता मूळ अधिवासात परत पाठवण्याच्या दृष्टीकोनातूनच त्यांचे पालनपोषण करण्यात आले. बोर अभयारण्यात आणि नंतर पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुल्या पिंजऱ्यात त्यांना शिकारीचे प्रशिक्षण देण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक रमेश आणि डॉ. पराग निगम यांनीही या वाघिणीच्या सक्षमतेचे प्रमाणपत्र दिले. त्यांना मूळ अधिवासात सोडण्याची वेळ आली तेव्हा मात्र अधिकाऱ्यांची नकारात्मकता आड आली. सुरू होण्याआधीच प्रयोग थांबवण्याचा प्रकार पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाकडून घडला. दरम्यान, एका वाघाला त्यांनी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात पाठवून दिले. सृष्टी पर्यावरण संस्थेने पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीच्या सुटकेसाठी वनखात्याकडे प्रयत्न केले. पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने त्यातील एका वाघिणीच्या सुटकेची तयारी दर्शवली, मात्र सुरुवातीपासून नकारात्मक मानसिकता ठेवल्याने प्रयोग फसला आणि वाघीण पुन्हा बंदिस्त झाली.
राज्याच्या वन्यजीव खात्याची धुरा श्री.भगवान यांच्या हातात आल्यानंतर त्यांनी नव्या चमूसह प्रयोगाची सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी गिरीश वशिष्ट, सृष्टी पर्यावरण मंडळाचे प्रतिनिधी, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी तसेच भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक रमेश व डॉ. पराग निगम यात सहभागी असणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा