शिवसेनेत बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे गटातून एकूण नऊजणांना मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे यात टीईटी घोटाळ्याचे आरोप झालेले अब्दुल सत्तार आणि पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आरोप झालेल्या संजय राठोड यांचाही समावेश आहे.
महाविकासआघाडी सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या अनेक नेत्यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याने नव्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कुणाला संधी मिळणार याची जोरदार चर्चा होती. त्यातच टीईटी घोटाळ्यावरून अब्दुल सत्तार यांच्यावर अनेक आरोप झाले. याशिवाय पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणाऱ्या संजय राठोडांवरही टीका होत होती. त्यामुळे त्यांना संधी मिळणार की नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. असं असताना अखेर शिंदे गटातून कुणाला संधी मिळणार हे आता स्पष्ट झालंय.
शिंदे गटातून मंत्रिमंडळात कुणाला संधी?
१. दीपक केसरकर
२. दादा भुसे
३. उदय सामंत
४. संदीपान भुमरे
५. तानाजी सावंत
६. शंभुराजे देसाई
७. गुलाबराव पाटील<br>८. अब्दुल सत्तार
९. संजय राठोड
मागील अनेक दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा रंगली होती. विरोधी पक्षनेते अजित पवारांसह महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांनी रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती. दिल्लीतून मान्यता मिळाल्याशिवाय मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. त्यामुळेच दोघांच्याही दिल्ली वाऱ्या सुरू असल्याचा खोटक टोलाही लगावण्यात आला होता. मात्र, अखेर आज (९ ऑगस्ट) मंत्रीमंडळ विस्तार झाला.