राज्याचे वादग्रस्त जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या स्वागताध्यक्षपदी निवडीमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेले साहित्य संमेलनाचे आयोजक आता सावरले असून खुद्द तटकरे यांनीही संमेलनाच्या तयारीला चालना दिली आहे.
संमेलनाच्या आयोजन समितीची बैठक तटकरे यांच्या उपस्थितीत काल चिपळुणात पार पडली. यापूर्वी संमेलनापासून काहीसे दूर राहिलेले माजी आमदार निशिकांत जोशी हेही या प्रसंगी उपस्थित होते. जलसंपदा खात्यातील घोटाळ्यांच्या पाश्र्वभूमीवर तटकरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड चांगलीच वादग्रस्त ठरली होती. शिवसेनेतर्फे त्या विरोधात आंदोलनाचाही इशारा देण्यात आला होता. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला देण्याचा निर्णय आयोजकांनी घेऊन त्यातील हवा काढून घेतली. मात्र यापूर्वी चिपळूणमध्ये विविध मोठे सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे केलेले माजी आमदार जोशी संमेलनापासून अंतर राखून होते. राजकारणात मुरलेल्या तटकरे यांनी त्यांचा रुसवा दूर केला. त्यामुळे आता संमेलनाच्या तयारीतील महत्त्वाचे अडथळे दूर झाल्याचे मानले जाते.
दरम्यान तटकरे यांनी काल संमेलनाच्या संयोजन समितीची बैठक घेऊन नियोजनाच्या दृष्टीने सूचना दिल्या.