आगामी चिपळूण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झालेले जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यासारख्या बहुरंगी, बहुढंगी आणि सर्वगुणसंपन्न व्यक्तीबद्दल आता साहित्यिकांनीच निर्णय घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी आज तोफ डागली.
जलसंपदा खात्यातील घोटाळ्यांमुळे तटकरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण गेल्या काही दिवसांत संमेलनाची संयोजन समिती आणि खुद्द तटकरे यांनी कौशल्याने या विरोधाची धार बोथट केली होती. त्यामुळे संमेलनाच्या आयोजनाला गती मिळेल, असे वाटत असतानाच आज पालकमंत्री जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना या वादाला पुन्हा तोंड फोडले. सध्या या संमेलनाबाबत जे काही चालले आहे ते साहित्याच्या परंपरेला, शिस्त आणि सभ्यतेला धरून नाही, अशी टिप्पणी करून पालकमंत्री म्हणाले की, काही लोकांनी कंबरेचे सोडून डोक्याला बांधायचे ठरवले तर आपण कसे वागायचे हे आपणच ठरवायचे असते. तटकरेंनी गटबाजी चालवली आहे. आपल्याच पक्षाला डावलून परस्पर कार्यक्रम घेण्याचा सपाटा चालवला आहे. त्याबाबतच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या आहेत. माजी आमदार रमेश कदम यांची तर ‘मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी’ अशी अवस्था आहे. या घडामोडींमुळे तालुक्यातील, जिल्ह्य़ातील सामान्य साहित्यप्रेमी दु:खी आहे.
तटकरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी संमेलनाच्या संयोजन समितीचे प्रमुख कार्यवाह प्रकाश देशपांडे आणि प्रकाश काणे माझ्याकडे चर्चेसाठी आले होते. तेव्हा मी त्यांना सर्वतोपरी साहाय्याचे आश्वासन दिले होते, असा गौप्यस्फोट करुन जाधव म्हणाले की, त्यानंतरच्या घडामोडींचा मात्र या उभयतांनी मला थांगपत्ता लागू दिला नाही. उलट मीच सहकार्य न केल्याचे प्रसारमाध्यमांना सांगून माझी बदनामी केली. तटकरेंच्या निवडीनंतर ते मला भेटले तेव्हा ते कोणताही खुलासा करू शकले नाहीत. तसेच रत्नागिरी जिल्ह्य़ात या पदासाठी अनेकजण पात्र असताना हा मान का डावललात, या प्रश्नाचेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या संमेलनाचे उद्घाटक असले तरी ते येतील किंवा नाही, याबाबत मी काही सांगू शकत नाही, पण सध्याच्या सर्व घडामोडींची ते योग्य दखल घेतील अशी खात्री आहे. आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेले असल्याचे जाधव यांनी उद्वेगाने नमूद केले आणि यापुढे मात्र आपण गप्प राहणार नाही, असेही सूचित केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा