कोपर्डीतील तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबवा, मराठा समाजाला आरक्षण आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासह इतरही अनेक मागण्यांसाठी सकल मराठा-कुणबी समाज संघटनेतर्फे आज नागपुरात काढण्यात आलेल्या मोर्चाची दुपारी तीनच्या सुमारास सांगता झाली. यावेळी मराठा मोर्च्याच्या शिष्टमंडळाने विधानभवनात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. यावेळी झालेल्या बैठकीत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही केली. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांविषयी सकारात्मकपणे व्यक्त होत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायदेशीर पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे सांगितले. सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या मोर्च्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. नागपुरातील यशवंत स्टेडियमपासून सुरू झालेल्या या मोर्चाची मॉरिस टी पॉइंट येथे राष्ट्रगीतानंतर सांगता झाली. या मोर्च्यात सत्ताधारी आणि विरोधकांसह तब्बल १५० पेक्षा अधिक आमदार सहभागी झाले होते. पक्ष शिष्टाचार डावलून प्रामुख्याने मराठा आणि कुणबी आमदार या मोर्चात सहभागी होण्यासाठी एकवटले होते.
गेल्या एका महिन्यापासून हा मोर्चा यशस्वी करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा संघटनांची मोर्चेबांधणी सुरू होती. राज्यभरातून मराठा समाजाचे जास्तीत जास्त लोक याठिकाणी जमतील, यासाठी आयोजकांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले होते. नागपूरमध्ये मुक्कामी येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी १५ मंगल कार्यालयात निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय, मोर्चासाठी राज्यभरातून स्वत:च्या वाहनाने येणाऱ्यांसाठी शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मोर्चाच्या व्यवस्थेसाठी ३ हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात आतापर्यंत निघालेल्या मराठा मोर्चापेक्षा सर्वात मोठा मोर्चा नागपुरातील असावा असे नियोजन आयोजकांनी केले होते. पाच लाखांपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार प्रत्यक्ष मोर्च्यालाही मोठी गर्दी पाहायला मिळत होती. राज्यातील विविध जिल्ह्यांत निघालेल्या मोर्चामध्ये वकिलांचा मोठा सहभाग दिसून आला व त्याकारणामुळे ते मोर्चे ओळखले जाऊ लागले. मात्र, प्रथमच नागपुरात निघणाऱ्या मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चात तब्बल १५ हजारांहून जास्त डॉक्टर्स सहभागी झाले होते. त्यामुळे हा मोर्चा डॉक्टरांच्या सहभागामुळे ओळखला जाणार आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी नागपुरातील मराठा- कुणबी डॉक्टरांनी तब्बल आठ ते दहा बैठका घेतल्या. नागपुरातून जवळपास ७ हजार डॉक्टर्स मोर्चात सामील झाले होते. सहभागी डॉक्टरांना मोर्चाच्या संदर्भातील सूचना व आचासंहितेबद्दल माहिती देण्यात आली. तसेच सर्वाचा ड्रेस कोड ठरविण्यात आला. मोर्चात नामवंत व प्रसिद्ध एमबीबीएस, एमडी, विद्यार्थी डॉक्टरांसह महिला डॉक्टरांचा समावेश होता.