स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा विधानपरिषद जागांसाठीच्या निवडणुकांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये भाजप व काँग्रेसने प्रत्येकी दोन तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. पुणे, सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ आणि गोंदिया या सहा ठिकाणी विधान परिषदेसाठी १९ नोव्हेंबरला मतदान झाले होते. सहा जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात होते. यामध्ये यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी सावंत, नांदेडमध्ये काँग्रसेच अमर राजूरकर, गोंदियात भाजपचे परिणय फुके, जळगावमध्ये शिवसेना-भाजप युतीचे चंदू पटेल , सातारा-सांगलीत काँग्रेसच्या मोहनराव कदम आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी विजय संपादन केला. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्चस्वाची चाचपणी करण्याच्यादृष्टीने विधानपरिषद निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तत्त्वे, निष्ठा गुंडाळून आपापल्या स्वार्थासाठी परस्परांकडे मदतीसाठी हात पसरले होते. आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीचा विचार करता विधानपरिषदेच्या जळगाव, सातारा-सांगली आणि नांदेड या जागांच्या निकालांबद्दल अनेकांना उत्सुकता लागली होती.
यापैकी जळगावची निवडणूक भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सुप्त संघर्षामुळे रंगतदार बनली होती. आतापर्यंत नेहमी बिनविरोध होणारी निवडणूक यंदा अविरोध न होणे खडसेंचे यश असल्याचे मानले जात होते. त्यामुळे या निवडणुकीत खडसे समर्थकांच्या गटाकडून भाजपला अपशकून होण्याची भीती होती. मात्र, सरतेशेवटी चंदू पटेल यांनी सर्व शक्यतांना विराम देत जळगावच्या जागेवर विजय मिळवला. तर दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या नांदेडमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यात अशोक चव्हाण यांना यश आले. मागील वेळेसची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली होती. या वेळी काँग्रेसच्या वतीने निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु खा. चव्हाणांचे कट्टर राजकीय विरोधक आ. चिखलीकर यांनी त्यांचे मेहुणे व माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांना मैदानात उतरवले होते. शिंदे यांना भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे ही लढत तुल्यबळ झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या अमर राजूरकर यांनी २५१ मते मिळवत ४८ मतांच्या मताधिक्याने विजय मिळवला. मात्र, अशोक चव्हाणांचे नांदेडमधील आतापर्यंतचे वर्चस्व पाहता श्यामसुंदर शिंदे यांना मिळालेली २०८ मते ही विरोधकांच्यादृष्टीने मोठे यश मानले जात आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या सातारा-सांगलीतील लढतीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या जागेवर काँग्रेसच्या मोहनराव कदम यांनी मिळवलेला विजय अजित पवारांसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. अजित पवार यांनी शेखर गोरे यांना पक्षात आणून उमेदवारी दिल्याने पक्षाच्या बालेकिल्ल्यातच धुसफुस सुरू झाली होती. अजित पवारांच्या या निर्णयावर जयंत पाटील आणि उदयनराजे भोसले नाराज होते. त्यामुळे आधी सोपी वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीसाठी कठीण झाली होती.