डाळिंबाच्या झालेल्या व्यवहारातून कोणाला पुढील पंधरा दिवसात जवळपास साठ लाखाचे उत्पादन मिळणे अपेक्षित होते तर ३२ रुपये किलोप्रमाणे व्यापाऱ्याला दिलेल्या द्राक्ष बागेतून कोणाला दहा लाख मिळण्याचा अंदाज होता. कोणाला तीन एकर गव्हाच्या क्षेत्रातून २१ पोते होण्याची अपेक्षा होती. या सर्वाच्या स्वप्नांवर गारपिटीने असा काही वरवंटा फिरविला की, असे काही उत्पन्न मिळणे तर दूर, उलट भल्यामोठय़ा कर्जाच्या बोज्याखाली दबण्याची वेळ हजारो शेतकऱ्यांवर आली आहे. गारपीट व अवकाळी पावसाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी शुक्रवारी केंद्रीय समितीच्या सदस्यांनी केली. या दौऱ्याच्या पूर्वसंध्येपर्यंत निसर्गाचा तांडव सुरू होता. नैसर्गिक आपत्तीने ग्रामीण भाग कशाप्रकारे पूर्णपणे उध्वस्त झाला त्याची प्रचीती ठिकठिकाणी पहावयास मिळते. नैसर्गिक संकटाने ग्रामीण भागात विदारक स्थिती असताना निफाड तालुक्यात नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री येण्याची शक्यता असल्याने म्हाळसाकोरे येथे नुकसानग्रस्त शेतीसमोर ‘हेलिपॅड’ उभारण्याचे युध्द पातळीवर काम केले जात असल्याबद्दल स्थानिकांमध्ये संतप्त भावना उमटत आहे.
आदल्या दिवशीप्रमाणे केंद्रीय पाहणी समितीने नाशिक जिल्ह्यात धावता दौरा करत काही ठिकाणी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. गुरूवारी सायंकाळी गारपिटीने कशीबशी तग धरुन राहिलेल्या द्राक्षबागा, डाळिंब, गहू, हरभरा, कांदा, टोमॅटो असे सर्व काही भुईसपाट केले. दहा दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीचे तडाखे सहन करणारा शेतकरी आर्थिकदृष्टय़ा कसा कोलमडला त्याची शेकडो उदाहरणे ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. सलग तीनवेळा गारपिटीचा फटका बसलेल्या निफाड तालुक्यातील अनंत जगताप यांनी मोठय़ा कष्टाने फुलविलेली नऊ एकरची द्राक्ष बाग निम्म्याहून अधिक भुईसपाट झाली. उर्वरित बागेतही काही शिल्लक राहिलेले नाही. गारपीट होण्यापूर्वीच एका व्यापाऱ्याशी त्यांचा ३२ रुपये किलोप्रमाणे व्यवहार निश्चित झाला. या व्यवहारातून १० लाखाचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु, बाग काढणीचे काम सुरू होण्यापूर्वीच गारपिटीने सर्व उध्वस्त झाले. शेतीसाठी सहकारी सोसायटीतून घेतलेले १५ लाखाचे पीक कर्ज कसे फेडायचे हा त्यांच्यासमोरील प्रश्न आहे. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. नुकसानग्रस्त द्राक्षमण्यांचा बेदाण्यासाठी वापर होऊ शकत नाही.
मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील पुंजाराम पवार यांची डाळिंब शेती तुफान गारपिटीने होत्याची नव्हती झाली. १०५ रुपये किलो या दराने व्यापाऱ्याशी त्यांचा करार झाला होता. त्यातून जवळपास साठ लाखहून अधिक कमाई होण्याची अपेक्षा होती. अध्र्या तासाच्या गारपिटीत अपेक्षित असणारे सर्व उत्पन्न बुडित खाती जमा झाले. त्यांच्या डोक्यावर १८ लाखाचे कर्ज होते. असे हजारोंच्या संख्येने शेतकरी कळवण, मालेगाव, सटाणा व देवळा भागात आहेत. कोणाचे गहू गेले तर कोणाचे कांदे. आता केवळ कर्जाचा डोंगर तेवढा शिल्लक असल्याची त्यांची प्रतिक्रिया आहे.
या स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री महोदयांना गारपिटग्रस्त भागात सहजपणे पोहोचता यावे म्हणून प्रशासनाने थेट निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतासमोर ‘हेलिपॅड’ बांधण्याचे काम हाती घेतले. महसूल अधिकाऱ्यांसह कृषी विभागाचेही स्थानिक अधिकारी त्या कामात जुंपले गेले. नुकसानीचे पंचनामे करण्यास दिरंगाई करणारे हे अधिकारी या कामात सक्रिय झाल्याचे पाहून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता व संताची लाट निर्माण झाली आहे.

Story img Loader