पत्र्याच्या दोन खोल्या. संसार काय तर मोजून चार भांडी. पत्र्याची ट्रंक, एक एकर शेती. त्यावर अडीच लाखांचे कर्ज ठेवून जालना जिल्ह्य़ातील कर्जत गावामधील कुंडलिक बनसोडे या शेतकऱ्याने चार महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. मुलीच्या लग्नासाठी सावकारी कर्ज काढले, ते आजही कायम आहे. या शेतकऱ्याची आत्महत्या सरकारने ‘पात्र’ ठरवली. लाखाची मदतही केली. ७० हजारांची अनामत रक्कम आणि ३० हजार रुपये रोख, असे मदतीचे स्वरूप. सरकारने दिलेला धनादेश अजून वटला नाही. अशा स्थितीत पाऊस आला आणि मृत कुंडलिकरावांच्या पत्नी मंदाबाईची चिंता वाढली. पाऊस आल्यावर चिंता मिटेल, हे खरेच. पण मंदाबाईची चिंता आहे ती बियाणे कोठून आणायचे याची!
दुष्काळाने नापिकीला कंटाळून कुंडलिक बनसोडे या शेतकऱ्याने मार्चमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना त्यांच्या मुलाला मुंबईत सांगितली गेली. तो तेथे डी. एड.चे शिक्षण पूर्ण करून सात हजारांच्या पगारावर नोकरी करीत होता. परळ येथील डी. एड. विद्यालयात शिक्षण पूर्ण करून एका प्रशिक्षण संस्थेत तो नोकरीला लागला. वडिलांच्या निधनाची बातमी कळली आणि तो गावाकडे परतला. घरात दोघे माय-लेक.
जगण्याची सारी साधने थिजलेली. गावात आल्यावर करायचे काय, हा प्रश्न मंदाबाईच्या मुलासमोर आहे. सरकारी मदतीचे काही पैसे बँकेत जमा आहेत. पण ते काढता येत नाहीत. ३० हजार रुपये रोखीत मिळतील, तेव्हा ती रक्कम सावकाराला द्यावी लागेल. परिस्थितीने जखडून टाकल्याने मंदाबाई हतबल. डोळ्यातले पाणी हटत नाही. त्या म्हणतात, ‘एकरभर रानात काय येणार आणि काय खाणार? पण पेरावं तर लागेल. पैसे मिळाले की, सरकीचे बियाणे आणू. पण नुसत्या शेतीवर काय होणार? आत्महत्याच की! सरकारने केलेल्या लाखाच्या मदतीपेक्षा या पोराला नोकरी लागली असती तर बरे झाले असते.’
कर्जत, दोन-अडीच हजार लोकसंख्येचे गाव. पाऊस आला नि मंगळवारी रोहयोच्या कामाला सुटी मिळाली. आठ दिवसांपूर्वीच हे काम कसेबसे सुरू झाले होते. त्यामुळे अर्धा गाव तेथे लोटला. डी.एड. पूर्ण झाल्यानंतरही आईला मदत म्हणून मंदाबाईचा मुलगाही रोजगार हमीच्या कामावर गेला.
पाऊस पडल्याने मशागत करावी लागेल, असे तोही सांगतो. पण त्यासाठी लागणारे पैसे नि बियाण्याचा खर्च कोठून करायचा, हे त्यालाही कळत नाही. गावातल्या मित्रांकडे त्याने उधार उसनवारी सुरू केली आहे.
नारायण उगले यांना अडीच एकर शेती. दोन मुलींचे लग्न झाले. याच काळात त्यांना कर्ज झाले. या वर्षी शेती पिकली नाही. ते मंडप टाकण्याचाही व्यवसाय करतात. पण पैसाच शिल्लक नाही म्हणून ते व त्यांची पत्नी द्वारकाबाई मजुरीला जातात. त्यांची मुलगी मनीषा दहावीला आहे. तिला शिक्षिका व्हायचे आहे. तिच्या वह्य़ा-पुस्तकांचा खर्च वेगळाच. यातच बाजरी, कापूस लागवडीसाठी तेही पैसा गोळा करीत आहेत. त्यांच्याही समोर प्रश्न तोच. पैसा कोठून आणायचा? जुने कर्ज फिटले नाही, नवीन कोण देणार?
प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था उधार-उसनवारीवरच. मराठवाडय़ातल्या बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. आकाशात ढगांची गर्दी दिसत आहे. आता चांगले घडेल, अशी प्रत्येकाला आशा आहे. पण पाऊस आल्यानंतरही चिंतेत भरच पडली आहे. एकूणच ही अवस्था सरकारी अनास्थेचा परिणाम असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या अनुषंगाने बोलताना कर्जमुक्ती आंदोलनाचे अॅड. विष्णू ढोबळे म्हणाले की, जेव्हा गरज असते, तेव्हा मदत मिळत नाही. पुन्हा मदत मिळाली तर त्याचा उपयोग होत नाही. एवढय़ा आत्महत्या झाल्यानंतरही बियाणे व खतासाठी सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे. अशा प्रकारची उपेक्षा पुरोगामी राज्यासाठी लाजिरवाणी आहे.
पाऊस आला, चिंता वाढली!
पत्र्याच्या दोन खोल्या. संसार काय तर मोजून चार भांडी. पत्र्याची ट्रंक, एक एकर शेती. त्यावर अडीच लाखांचे कर्ज ठेवून जालना जिल्ह्य़ातील कर्जत गावामधील कुंडलिक बनसोडे या शेतकऱ्याने चार महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. मुलीच्या लग्नासाठी सावकारी कर्ज काढले, ते आजही कायम आहे. या शेतकऱ्याची आत्महत्या सरकारने ‘पात्र’ ठरवली. लाखाची मदतही केली.
First published on: 06-06-2013 at 02:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loan farmers family has no money to buy seed even after rain