स्थानिक अस्मिता चेतवत परप्रांतियांच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण ढवळून काढणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील विकास कामांच्या नियोजनात स्थानिक वास्तुरचनाकारांना बाजूला सारत मुंबईच्या मंडळींना प्राधान्य दिल्याने दि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्ट्च्या (आयआयए) स्थानिक शाखेने नाराजी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजाविणारे अनेक  वास्तूरचनाकार नाशिकमध्ये असताना आणि त्यांना शहरातील समस्यांची पूर्ण जाणीव असताना ‘उपऱ्या’ वास्तुरचनाकारांना आणून राज यांनी जो प्रयत्न आरंभिला आहे, त्यास ‘आयआयए’ने आक्षेप घेत तीव्र विरोध दर्शविला आहे.
परप्रांतातून येणाऱ्या लोंढय़ांमुळे स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी हिरावल्या जातात, असे उच्चरवाने सांगणाऱ्या राज यांनी शहरातील विकास कामांचे नियोजन करण्याच्या प्रक्रियेत स्थानिकांना पद्धतशीरपणे डावलल्याची या वास्तुरचनाकारांची भावना आहे. त्यांचा हा उद्वेग आयआयएच्या नूतन कार्यकारिणीने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बाहेर आला. पालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर राज यांनी अलीकडेच १५ वास्तुरचनाकारांची फौज आणली होती. विकास कामांच्या संकल्पना व नियोजन करण्याच्या दृष्टीने त्यांनी हे पथक कार्यरत केले आहे. त्यात सर्व सदस्य नाशिकबाहेरील आहेत. या पथकाने एक-दोन दिवस सर्वेक्षण करून विकास कामांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. राज ठाकरे यांची ही कृती स्थानिक वास्तुरचनाकारांचा अवमान करणारी असून त्याचा संस्थानिषेध करणार असल्याचे आयआयएच्या कार्यकारिणी सदस्य अमृता पवार, अध्यक्ष नीलेश चव्हाण व उपाध्यक्ष प्रदीप काळे यांनी सांगितले. वास्तविक, शहरातील प्रश्नांविषयी स्थानिकांना अधिक माहिती असते. स्थानिक पातळीवर काम करण्याचा त्यांच्याकडे अनुभवही अधिक आहे. शहर नियोजनाच्या कामात स्थानिक वास्तुरचनाकारांना प्राधान्य देण्याचा मुद्दा पालिका आयुक्तांकडे मांडला जाणार असल्याचे पवार यांनी नमूद केले.
नूतन कार्यकारिणीने दोन वर्षांत कुंभमेळ्याच्या नियोजनात पालिकेला तांत्रिक सल्ला देणे व हातभार लावणे, गोदावरी व शहर प्रदूषण मुक्त करण्यासाठी पाठपुरावा करणे, ट्रॅफिक सेलच्या माध्यमातून वाहतूक सुधारणा, दुभाजक व पार्किंग व्यवस्था याबद्दल उपाय सुचविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. बाहेरून आलेल्या वास्तुरचनाकारांवर आक्षेप नोंदविण्याच्या या प्रकारात मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वादाचीही एक किनार असल्याचे म्हटले जात आहे.  

Story img Loader