विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एमआयएम संघटनेने मुस्लिम व दलित वंचित घटकांची मते मोठय़ा प्रमाणात घेतल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएम संघटनेवर जातीयवादाचा आणि दहशतवादाचा आरोप केला आहे, असा प्रत्यारोप एमआयएमचे स्थानिक उमेदवार तौफिक शेख यांनी केला आहे.
यासंदर्भात सोमवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना शेख यांच्यासह संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाचा समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांनी विकासाच्या मुद्दय़ावर विजय मिळविला नाही तर केवळ धनशक्तीच्या बळावर विजय संपादन केला आहे. किंबहुना त्यांनी मतेच विकत घेतली. निवडणूक काळात पैसे वाटप करताना आमदार शिंदे यांच्या समर्थकांवर चार खटले दाखल असल्याचा संदर्भही त्यांनी दिला. एमआयएम संघटना व दहशतवादी संघटना यात फरक काय, असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला होता. या त्यांच्या विधानाचा एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला. एमआयएम संघटना दहशतवादी नाही तर देशातील मुस्लिम अल्पसंख्याक समाज व दलित समाजाच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे. या संघटनेने आतापर्यंत कोणतेही देशद्रोही कृत्य केले नाही. उलट, आतापर्यंत सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाने मुस्लिम व दलितांचा वापर केवळ मतांसाठी करून घेतला. त्याबद्दल आवाज उठविणे हा देशद्रोह आहे का, असा सवाल शेख यांनी केला. यावेळी अर्जुन सलगर, सनी मुल्ला, इम्तियाज अल्लोळी, कोमारे सय्यद, शकील शेख, इसाक शेख, भारती कोळी आदींची उपस्थिती होती.
वंचितांची मते दुरावल्यामुळे शिंदे यांचा एमआयएमवर आरोप
मुस्लिम व दलित वंचित घटकांची मते मोठय़ा प्रमाणात घेतल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएम संघटनेवर जातीयवादाचा आणि दहशतवादाचा आरोप केला आहे, असा प्रत्यारोप एमआयएमचे स्थानिक उमेदवार तौफिक शेख यांनी केला आहे.
आणखी वाचा
First published on: 05-11-2014 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local candidate taufik shaikh of mim criticized mla praniti shinde