सांगली : आर्थिक कारणातून धुळे जिल्ह्यातील करंजगव्हाण गावच्या शिवारातून अपहरण केलेल्या तरूणाची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला बुधवारी यश आले. या प्रकरणी अपहरण करणार्या दोन तरूणांना अलकूड फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथून पोलीसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सायंकाळी दिली.
करंजगव्हाण (जि. धुळे) येथून दि. १६ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजता निहाल सुभाष पवार (वय २३, रा. अंजनाळे जि. धुळे) याचेअज्ञात तरूणांनी काळ्या रंगाच्या स्कार्पिओ मोटारीतून अपहरण केले होते. याबाबत वडनेर खाकुर्डी (नाशिक ग्रामीण) पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द अपहरण केल्याचा गुन्हा दि. १७ मार्च रोजी दाखल करण्यात आला होता. याबाबत सांगली पोलीसांना तपासाबाबतचे पत्र मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तैनात करण्यात आले होते.
पोलीस कर्मचारी दिपक गायकवाड यांना अपहरण करणार्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांनी अन्य कर्मचार्यासह अलकूड फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथील बंद असलेल्या मका कारखान्यावर छापा टाकला असता दोन तरूणासह एक तरूण घाबरलेल्या स्थितीत वाहनात आढळून आला.
या प्रकरणी शरद गलांडे (वय २२, रा. रांजणी) व शंकर गिड्डे (वय २२ रा. रामपूरवाडी) या दोघांना अटक करण्यात आली असून अपहृत तरूण पवार यास पोलीसांनी ताब्यात घेउन नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अपहरणासाठी वापरण्यात आलेले वाहन आणि दोघांना वडनेर खाकुर्छी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.