मध्यरात्री डहाणू आणि वनगाव रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची चर्चगेटच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक पूर्ण विस्कळित झाली आहे. यामुळे पहाटे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या तसंच लोकल सेवा बंद झाल्या होत्या. तसंच लोकल सेवा पालघरपर्यंत मर्यादित ठेवावी लागली होती.
पश्चिम रेल्वेने युद्धपातळीवर सकाळपर्यंत काम पूर्ण केले. असं असलं तरी डहाणू मार्गावरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्या या उशिराने धावत आहेत.
आधीच सहावा मार्ग टाकला जात असल्याने अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असताना त्यात आणखी एका समस्येची भर पडली आहे. त्यामुळे आज पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल सेवेचा आणखी खोळंबा होत प्रवाशांना मोठ्ठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत या ११ दिवसांत २,५२५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. २७ आणि २८ तारखेला प्रत्येकी २५६ फेऱ्या रद्द झाल्या. तर रविवारी ११६ अप आणि ११४ डाऊन अशा एकूण २३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. फेऱ्या रद्द झाल्याने रेल्वे स्थानक आणि लोकलमधील गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आहे. अनेकठिकाणी धक्काबुक्कीच्या घटना घडल्या आहेत. अशी परिस्थिती असताना ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हजारो प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.