करोनाच्या संचारबंदीचा फटका महाबळेश्वर, पाचगणीतील सर्वच घटकांना बसत आहे. पर्यटकांअभावी महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरी उत्पादक व विक्रेत्याबरोबसह अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी पाठोपाठ पंतप्रधान मोदींनी 14 एप्रिल पर्यंत देशभरासाठी लॉक डाऊनचा निर्णय घेतल्याने आता याचे परिणाम सर्वत्र दिसत आहेत. महाबळेश्वर-पाचगणी येथे सध्या पर्यटक नसल्याने स्ट्रॉबेरी उत्पादकांना ग्राहकांना अभावी स्ट्रॉबेरी शेतातच फेकून देण्याची वेळ आली  आहे. या जमावबंदीचा मोठा फटका महाबळेश्वर पाचगणीतील चारशे घोडे व्यवसायिकांना सुध्दा बसला आहे. हातावर पोट असलेल्या घोडे व्यवसायिकांची व त्यांच्या घोडयांची आता उपासमार होत आहे. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाने घोडयांच्या रोजच्या खुराकाची सोय करावी अशी मागणी महाबळेश्वर तालुक्यातील घोडे व्यवसायिक संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांना दिले आहे.

महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ असुन येथील स्ट्रॉबेरी व घोडे सफारी प्रमुख आकर्षण आहे. ब्रिटीश काळापासून येथे अनेक स्थानिक लोक घोडे व्यवसायावर अवलंबून आहेत. तालुक्यात साधारण चारशे घोडे व्यवसायिक आहेत. त्यांच्या घोडयांना रोज साधारण २५० ते ३०० रूपयांचा खुराक लागतो. या मध्ये कडबाकुट्टी व भुसा बारीक गोळीची पेंड, चना याचा समावेश असतो.

सध्या करोनामुळे देशात संचारबंदी जाहीर झाली आहे. सर्वच ठिकाणचे व्यवसाय बंद झाले तसे महाबळेश्वर पाचगणी पर्यटनस्थळही बंद झाले. यामुळे येथील छोट्यामोठ्या व्यवसायिकांची उपासमार सुरू झाली आहे. आता पर्यटक नसल्याने मागील 20 दिवसांपासून महाबळेश्वर पाचगणीतील पर्यटन बंद आहे. यामुळे दैनंदिन कमाईवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची आता उपासमार होणार आहे. स्ट्रॉबेरी शेतातच फेकून द्यावी लागत आहे. तर घोड्यांचा खुराक आता केवळ दोन ते तीन दिवसांचाच शिल्लक राहिला असल्याने घोडे व्यवसायिकांपुढे घोडयांच्या उपजिवीकेचा प्रश्न उभा राहीला आहे.

Story img Loader