सातबारा उता-यांच्या गोंधळावर तलाठी कार्यालयांना टाळे ठोकण्याचा दिलेला इशारा सोमवारी प्रत्यक्षात उतरला. बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी टाळगाव, विंग, शेणोली व वाठार येथील तलाठी कार्यालयास टाळे ठोकले, तर मलकापूर येथील तलाठी कार्यालयास टाळे ठोकण्याचा पंजाबरावांचा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला. यावेळी ठिय्या आंदोलनानंतर आंदोलनकर्ते व प्रशासनामध्ये सुसंवाद होऊन शेतक-यांना आवश्यक सर्व दाखले तत्काळ ऑनलाईन पद्धतीने देण्याचे तहसीलदारांनी लेखी पत्राने आश्वासन दिल्याचे पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
ऑनलाईन सातबारा उतारा मिळत नाहीत आणि तलाठी हस्तलिखित उतारे देत नाहीत, त्यामुळे शेतक-यांची कर्ज प्रकरणांसह अनेक कामे ठप्प झाली आहेत. या विरोधात बळीराजा शेतकरी संघटना कमलीची आक्रमक झाली आहे. तलाठी कार्यालयांना आज सोमवारी (दि. १३) टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला होता. त्यानुसार बळीराजा संघटनेने नियोजनबद्ध पद्धतीने कराड तालुक्यातील ४ तलाठी कार्यालयांना टाळे ठोकून अखेर प्रशासनाला नमवले.
कराड तालुक्यात ७/१२ खाते उतारे व वारस नोंद तलाठय़ामार्फत व हस्तलिखित बंद केले आहेत. त्यास पर्याय म्हणून ऑनलाईन पद्धतीने वरील कामे केली जात आहेत. परंतु ऑनलाईन पद्धत कराड या ठिकाणी असल्यामुळे शेतक-यांना नाहक त्रास होत आहे. सध्या अस्तित्वात असलेली ऑनलाईन पद्धत चुकीची असल्यामुळे मिळालेले उतारे बँका व इतर कामासाठी स्वीकारत नाहीत. एक खिडकीतून कामकाज होत असल्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. एका कामासाठी दोन दिवस ताटकळावे लागत आहे. तरी ऑनलाईन पद्धत चालू ठेवत पूर्वीप्रमाणे तलाठय़ांमार्फत हस्तलिखित उतारे व नोंद चालू कराव्यात व शेतक-यांची गैरसोय दूर करावी अन्यथा आज सोमवारी तालुक्यातील तलाठी कार्यालयांना शेतकरी टाळे ठोकतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला होता.

Story img Loader