नीरज राऊत
सातपाटीच्या बंदरात गेल्या चार दिवसांपासून आलेला सुमारे ४० टन माशांच्या विक्रीबाबत प्रश्न निर्माण झाला असताना मत्स्यव्यवसाय मंत्री व पालघर जिल्हाधिकारी यांनी सहकार्य केल्याने सातपाटी येथील या माशांच्या साठ्याची निर्यात करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
१२-१५ दिवस मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेलेल्या सुमारे ६० ते ७० बोटी २४ व २५ मार्च रोजी सातपाटी बंदरामध्ये दाखल झाल्या होत्या. मासे उतरवण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवत असताना देखील हा मत्स्यसाठा बंदरामधील शीतगृहांमध्ये दाखल झाला. शासनाने वाहतुकीवर तसेच बाजारांमध्ये खुल्या विक्रीवर निर्बंध आणल्याने या माशांच्या विक्रीबाबत तसेच त्यांची अन्य ठिकाणी वाहतूक करण्याकरीता प्रश्न निर्माण झाला होती.
या माशांमध्ये काही प्रमाणात पापलेट सह काटी, सुरमई, मुशी या निर्यात करण्याच्या दर्जाचे मासे होते. सध्या सातपाटी येथे मासेमारी केल्यानंतर मासे सहकारी सोसायटीमध्ये गोळा केले जातात. नंतर हे मासे पोरबंदर मार्गे निर्यात केले जातात. मात्र राज्यातील सीमा वाहतुकीसाठी बंद केल्याने निर्यातदार आपली वाहने सातपाटी येथे पाठवण्यास तयार नव्हते.
विविध मच्छीमार संघटनेच्या प्रतिनिधींनी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने गुजरातमधील तसेच राज्यातील संबंधित विभागांशी समन्वय साधून या माशांच्या वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. पालघरचे जिल्हाधिकारी, पोलीस यांनी निर्यातीसाठी मासे नेण्याकरता आलेल्या वाहनांची वाहतूक सोयीची होईल याकरिता सहकार्य केल्याचे येथील दि सर्वोदय सातपाटी फिशरमेंन सहकारी सोसायटीचे चेअरमन पंकज पाटील यांनी सांगितले. त्यामुळे मच्छीमारांसमोर आलेले संकट टळल्याने मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे आभार मानले आहेत.
खलाशांना घरी सुखरूप पाठविले
बाजारामध्ये माशांची विक्री करणे कठीण होत असल्याने तसेच खोल समुद्रात मासेमारीस जाण्यास खलाशी तयार नसल्याने सातपाटी बंदरातील सर्व बोटींनी तुर्तास मासेमारी स्थगित केली आहे. या आठवड्यात सातपाटी येथील बोटींमध्ये कामावर असलेल्या सुमारे एक हजार खलाशांना पोलिसांच्या मदतीने विक्रमगड, जव्हार व अन्य ठिकाणी सुखरूप पाठवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.