पंतप्रधान व मुख्यमंत्री राजीनामे देऊन लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीची एकत्र शिफारस करतील, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात वर्तवली. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत पंतप्रधान जनतेशी खोटे बोलत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

वाळवा येथील एका कार्यक्रमात पाटील बोलत होते. आ. पाटील म्हणाले, की गेल्या महिन्यात देशातील पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पटलावर वेगाने घडामोडी घडत असून यावरून लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान अचानकपणे राजीनामा देऊन निवडणुकीची शिफारस करू शकतील, तर या पाठोपाठ राज्यातही मुख्यमंत्री राजीनामा देऊन विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीची शिफारस करतील अशी शक्यता आहे.

देशात नोटाबंदीबाबत पंतप्रधान खोटे बोलत असून या निर्णयाबाबत जनतेला काहीही सांगितले नसताना मुलाखतीमध्ये मात्र याबाबतचा इशारा जनतेला दिला असल्याचे बोलत आहेत. नोटाबंदीचा हेतू साध्य झाला का? याचबरोबर १६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, युवकांना २ कोटी नोकऱ्या आदी घोषणांचे काय झाले याचे उत्तर सत्ताधारी भाजपने द्यावे. महागाई, भ्रष्टाचार निपटून काढण्याचे आश्वासन त्यांनी देले होते, या आश्वासनाचे काय झाले याचा जाब जनता त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी या वेळी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या नाही

सहकार हा ग्रामीण भागाच्या प्रगतीचा मूलमंत्र असून नव्या पिढीने याची नोंद घ्यायला हवी. पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचे उत्तम जाळे विणल्याने अनेकांना शेतीला जोडून रोजगार मिळाला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या नाहीत. मात्र या उलट चित्र विदर्भ, मराठवाडय़ात आहे. तिथे सहकाराचे क्षेत्र विकसित न केल्याने शेतक ऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे.

Story img Loader