पालघर : लोकसभा मतदारसंघातील बोईसर विधानसभा मतदार क्षेत्रातील सात मतदान केंद्रांसाठी साहाय्यकारी मतदान केंद्रांच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगाने अखेरच्या वेळी मान्यता न दिल्यामुळे धानीव, गोखिवरे व पेल्हार येथील प्रस्ताविक साहाय्यकारी मतदान केंद्र २८ एप्रिल रोजी मूळ मतदान केंद्रांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक शाखेतर्फे घेण्यात आला होता. त्यामुळे या सर्व सात मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या इतर मतदारांच्या अपेक्षा दीडपट- दुप्पट असल्याने या सर्व सात ठिकाणी मतदारांच्या सुरुवातीपासून रांगा लागल्या होत्या. शिवाय या ठिकाणी सायंकाळच्या वेळी मतदार मोठय़ा संख्येने आले. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहिले. पेल्हार येथील मतदान रात्री १०.३५ वाजता संपले.

या मतदारसंघात इतर काही ठिकाणी मतदान संपण्याच्या काही मिनिटे अगोदर मोठय़ा संख्येने मतदार दाखल झाल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. इतर काही ठिकाणी उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगाराला दुपारनंतर मतदानासाठी सवलत दिल्याने सायंकाळच्या प्रहरी अनेक मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. त्यामुळे अशा काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू राहिले.

ईव्हीएम मशीनसोबत जोडलेल्या व्हीव्हीपॅट मशीनमधून स्लिप बाहेर पडण्यास तसेच त्यानंतर वाजणारा बीप आवाज थांबण्यास दहा ते बारा सेकंदांचा अवधी लागत असल्याने मतदानाच्या गतीवर मर्यादा आल्या. आपण दिलेले मत योग्य प्रकारे त्या यंत्रामध्ये पडते हे पाहण्यास मतदार उत्सुक असे.

काही ठिकाणी सीएफएल दिव्यांच्या प्रकाशामुळे व्हीव्हीपॅट मशीन बंद पडत असल्याचे दिसून आल्याने या यंत्रणा प्रकाशापासून झाकण्यात आल्या. प्रत्यक्षात मतदान कक्षात अंधूक प्रकाश असल्याने मतदारांना आपले नाव शोधण्यास वेळ लागत होता. या सर्वाच्या परिणामामुळे काही ठिकाणी मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली.

मतदान केंद्रांवरून येणारी माहिती मतदान सुरू असताना टप्प्याटप्प्यात दर दोन तासांच्या अंतराने भरण्यात आली. त्यामुळे जिल्हा मतदान नियंत्रण कक्षात मतदारसंघातील मतदानाची ताजी माहिती उपलब्ध होती. मतदानाची वेळ संपल्यानंतर प्रत्येक साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ईव्हीएम यंत्र जमा झाल्यानंतर त्यांनी मतदार केंद्रनिहाय अंतिम माहिती या प्रणालीत भरल्यानंतरच त्याची शहानिशा केली गेल्यानंतरच आज सकाळी १०.३० वाजल्यानंतर मतदानाची टक्केवारी अंतिम करण्यात आली.

त्याचबरोबरीने भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘सुविधा’ या अ‍ॅपवरदेखील मतदानाची माहिती भरली जात होती. त्यामुळे पीडीएमएसच्या बरोबरीने सुविधा मार्फतदेखील या आकडेवारीचा ताळमेळ बसवला जात होता. मतदान आकडेवारी अचूक राहावी याकरिता एक्सेल शीटवर त्याचप्रमाणे मॅन्युअल पद्धतीने प्रत्यक्षपणे सर्व आकडय़ांची बेरीज करण्यात येत असल्याने मतदान आकडेवारी अंतिम करण्यासाठी कार्यरत असलेल्या सुमारे ५० कर्मचारी आणि २५ अधिकारी वर्गाने सलग २६ ते ३० तासांचे काम केले. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाचे कौतुक केले.

व्हीव्हीपॅटचे औत्सुक्य नव्हते

राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा प्रथमच वापर करण्यात आला होता. या यंत्रांमध्ये निर्माण होणारी स्लिप पाहण्यासाठी सर्व मतदारांमध्ये कुतूहल होते तसेच या यंत्रामध्ये पडणारी स्लिप बाहेर पडणार नाही याबद्दल राज्यातील ग्रामीण भागातील मतदानमध्ये चर्चा होत असे. मे २०१८ मध्ये झालेल्या पालघरच्या पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आला होता. त्या वेळी एम-२ प्रकारच्या यंत्राचा वापर झाला असताना अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन व्हीव्हीपॅट मशीन बंद पडली होती. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत एम-३ प्रकारची व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात आली होती. या सर्व व्हीव्हीपॅट यंत्र पालघरच्या मतदारांनी वर्षभरापूर्वी अनुभवल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या वेळी व्हीव्हीपॅट मशीनबद्दल पालघरकरांना विशेष कौतुक नव्हते.

मतदान यंत्रांत बिघाड

वसई : नायगाव पूर्वेकडील विभागात असलेल्या चंद्रपाडा येथील ३०४ मतदान केंद्राच्या मतदान यंत्रात बिघाड झाल्याने संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत मतदान सुरु होते. तसेच नालासोपारा येथील पेल्हार विभागात जिल्हा परिषद शाळा पेल्हार या केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड व एकच यंत्र उपलब्ध असल्याने येथील नागरिकांना पाच तासांहून अधिक वेळ रांगेत उभे राहावे लागले. केंद्रावर पिण्याची पाण्याची सोय नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. गोखिवरे येथील मतदान केंद्रावरही असाच प्रकार घडल्याने मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागल्या संताप व्यक्त झाला.