बारामती : बारामतीमधील छत्रपती, सोमेश्वर आणि माळेगाव साखर कारखाने, खरेदी-विक्री संघ, बारामती बँक, मार्केट कमिटी, नगरपालिका या सर्व संस्था आधीपासूनच सुरू होत्या. मात्र, या सर्व संस्था शरद पवार यांनी काढल्या, असे सांगणे कितपत योग्य आहे? बारामतीमध्ये सगळा विकास त्यांनीच केला असेल तर ३१ वर्षे मी काय केले? असे सवाल करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना लक्ष्य केले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमच्या कुटुंबातील जे चिरंजीव आमच्यावर टीका करत आहेत त्यांचा जन्मदेखील झाला नव्हता तेव्हापासून मी राजकारणामध्ये आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना फटकारले.   बारामतीमधील सर्व संस्था शरद पवार यांनी काढल्या, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत केले होते. त्याचा समाचार उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती येथे घेतला.

हेही वाचा >>> सांगलीतून सलग दुसऱ्यांदा काँग्रेसचा ‘हात’ गायब

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ बारामतीमधील कन्हेरी येथे मारुती मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर सभेत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘माझ्यावर टीका केली, तरी अंगाला भोके पडत नाहीत. लोकांना भावनिक कसे करतात, त्याचे उदाहरण म्हणजे शुक्रवारी शरद पवार हे व्यासपीठावर बसले होते. त्यांच्या पायाशी सुप्रिया सुळे, रोहित आणि युगेंद्र बसले होते. जेणेकरून सर्व कुटुंब कसे एकत्र हे दाखविण्याचा प्रयत्न होता. मी जेव्हा पहिल्यांदा १९९१ मध्ये खासदार झालो, तेव्हा रोहितचा जन्म झाला आणि तो सांगतो सर्व संस्था शरद पवार यांनी काढल्या. म्हणजे मी ३१-३२ वर्षे काहीच केले नाही का? बारामती इतरांमुळे सुधारली, अजित पवारांचा  संबंध नाही? छत्रपती सहकारी साखर कारखाना जाचक बंधूंनी आणला, माळेगाव सहकारी साखर कारखाना शेंबेकर, जाधवराव आणि बाकी मान्यवरांनी आणला. सोमेश्वर साखर कारखाना मुगराव अप्पांनी आणला. खरेदी-विक्री संघ, बारामती बँक, मार्केट कमिटी पूर्वीच होती.

नगरपालिका १८६५ पासून आहे. या संस्था पूर्वीपासूनच चालू आहेत, तर हे सर्वच शरद पवार यांनीच केले, हे सांगणे कितपत योग्य आहे? बारामतीतील विद्या प्रतिष्ठान ही शैक्षणिक संस्था १९७१-७२ मध्ये सुरू झाली, त्यानंतर बालविकास मंदिर सुरू झाले, कृषी विकास प्रतिष्ठान हे शरद पवार यांनी सुरू केले, मात्र या काळातही आम्ही या संस्थेकरिता विविध अनेक कामे केली.’    

‘जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेन’

सुनेत्रा पवार भाषणात म्हणाल्या, ‘आज मोठया पर्वाची सुरुवात होत आहे. कन्हेरी, काटेवाडी हे माझेच गाव असून मी इथूनच माझ्या समाजकार्याची सुरुवात केली. आपण संधी दिल्याने मला निवडणूक लढण्याचे बळ मिळाले. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील.’

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2024 ajit pawar raise question on development works in baramati criticized sharad pawar zws