आसाराम लोमटे, परभणी
प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परभणी मतदार संघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळत असे. ‘धनुष्यबाण’ विरुद्ध ‘घड्याळ’ अशा कट्टर प्रचाराला निवडणुकीत धार येत असे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून हा पक्ष या मतदारसंघात शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न करत आला पण या लढाईत ‘घड्याळ’ कधीच जिंकले नाही. मात्र प्रचारात घड्याळाचा गजर जाणवायचा. अर्थात तब्बल ३५ वर्षानंतर जशी धनुष्यबाणाबरोहबरच घड्याळ चिन्हाशिवाय निवडणूक होत आहे.
हेही वाचा >>> तोट्यात असणाऱ्या ३३ कंपन्यांकडून ५४२ कोटी रुपयांचे रोखे दान, एकट्या भाजपाला मिळाले तब्बल…
शरद पवार यांनी काँग्रेसविरुद्ध बंड पुकारून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यांच्या बंडाला पाठिंबा देणारे आणि त्यांचा अनुनय करणारे वरपूडकर हे पहिले खासदार होते. पुढे लगेचच १९९९ मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. शिवसेनेतर्फे सुरेश जाधव, काँग्रेसतर्फे माजी मंत्री रावसाहेब जामकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वरपूडकर अशी तिरंगी लढत झाली. मतांचे विभाजन झाल्याने श्री. सुरेश जाधव यांना पुन्हा दिल्ली गाठता आली. अडीच लाख मते घेऊन त्यांनी विजय संपादन केला. जामकर यांना २ लाख १० हजार आणि वरपूडकर यांना १ लाख ७९ हजार मते मिळाली. घड्याळाच्या चिन्हावर वरपूडकर ही लोकसभेची पहिली निवडणूक हरले. दीर्घकाळ ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते मात्र या पक्षात येऊन वरपूडकर यांनी ‘घड्याळ’ चिन्हावर ज्या निवडणुका लढवल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये ते पराभूत झाले. त्यामुळे वरपूडकर यांना घड्याळ ‘धार्जिन’ नाही असे त्यांचे कार्यकर्तेही त्यावेळी बोलत असत.
हेही वाचा >>> काँग्रेसला ‘ठोसा’ देत ऑलिम्पिक पदकविजेत्या बॉक्सरचा भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीच्या ‘रिंग’मध्ये प्रवेश; कारण काय?
घड्याळाच्या चिन्हावर लोकसभेला त्यांची ही पराभवाची हॅट्रिक झाली. सततची गटबाजी हे या पक्षाचे वैशिष्ट्य होते. कधी विजय भांबळे विरुद्ध वरपूडकर, कधी फौजिया खान विरुद्ध वरपूडकर तर कधी बाबाजानी विरुद्ध वरपूडकर असा संघर्ष त्यावेळी पक्षात अस्तित्वात होता. एकावेळी वरपुडकर विरुद्ध सर्व अशी परिस्थिती झाल्याने आणि पक्ष नेतृत्वाकडूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वरपूडकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादीतून ते काँग्रेस पक्षात स्थिरावले एवढेच नाही तर आज पक्षाचे जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने विजय भांबळे यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत भांबळे यांचा पराभव झाला तर गेल्या निवडणुकीत राजेश विटेकर घड्याळाच्या चिन्हावर पराभूत झाले. या दोन्ही निवडणुका खासदार संजय जाधव यांनी जिंकल्या. अशाप्रकारे १९९९ ते २०१९ अशी दोन दशके शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूक लढवली पण त्यात राष्ट्रवादीला यश आले नाही.मधल्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले तेव्हा काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष राज्याच्या राजकारणात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.आगामी लोकसभेला परभणीतून राष्ट्रवादी लढणार नाही, आपल्याला शिवसेनेलाच या मतदारसंघात साथ द्यायची आहे असे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने स्थानिक नेत्यांना बजावले होते. असे असतानाही परभणी जिल्ह्यात या दोन पक्षात सातत्याने संघर्ष सुरू होता. एवढेच नाही तर राष्ट्रवादीची मनमानी सुरू असल्याचा आरोप करत खासदार संजय जाधव यांनी पक्षनेतृत्वाकडे आपला राजीनामाही सोपवला होता. आता दोन्हीही पक्षात उभी फूट पडल्यानंतर बरेच बदल झाले. राष्ट्रवादीतला शरद पवार गट हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत तर अजित पवार गट हा भाजपसोबत गेल्याने स्थानिक पातळीवरील गणितेही बिघडली. १९८९ पासून परभणी लोकसभा निवडणुकीत असलेला धनुष्यबाण जसा यावेळी गायब झाला तसेच स्थापनेपासून धनुष्यबाणाला या मतदारसंघात विरोध करणाऱ्या घड्याळाचा गजरही थांबला.