राज्यातील ४८ जागांचे लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने दहा जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी ७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे उमेदवार नीलेश लंके व भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या लढत होत आहे. नीलेश लंके यांनी आघाडी घेतली असून सुजय विखे पाटील हे पिछाडीवर आहेत. नीलेश लंकेंचे कौतूक करताना जयंत पाटील म्हणाले, नीलेश लंके हा एक सामान्य कार्यकर्ता आहे. सामान्य कार्यकर्ता कसा धनशक्तीच्या विरोधात लढू शकतो. सर्व साधनांच्या विरोधात लढू शकतो, हे नीलेश लंकेनं सिद्ध केलंय. त्यामुळे पैसा फार महत्वाचा नसतो. प्रतिष्ठा महत्वाची असते. लोकांमध्ये मिसळणं जास्त महत्वाचं असतं. नीलेश लंकेचंही अभिनंदन.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवारांच्या कामगिरीचा एकूणच आढावा जयंत पाटील यांनी यावेळी घेतला तसंच जनतेचे आभार मानले. जयंत पाटील पुढे म्हणाले, दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे हे अतिशय सामान्य घरातनं आलेले आहेत. शिक्षक पेशा आणि शिक्षक पेशात काम करणारा आमचा राष्ट्रवादीचा दिंडोरीचा तालुकाध्यक्ष, त्यांनाही विजयी करण्याचं काम तिथल्या जनतेनं करुन दाखवलं आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांनी प्रचंड ताकदीनं काम केलं. माढा लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील मोहिते पाटील हे सगळंचं घर पूर्वीपासून पवार साहेबांना मानणारं होतं. काही गैरसमजातून आमच्यापासून विजय मोहिते पाटील यांच्या संपर्कातील लोक दूर गेले. पण शरद पवार यांचं संघटन कौशल्य महत्वाचं आहे. शरद पवार यांनी त्यांना पुन्हा आपल्या बरोबर घेतलं. विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचं चित्र बदलायला त्यांची मोठी साथ झाली.

हेही वाचा : “ज्या दिवशी ते सगळं घडलं अन् आजचा दिवस…”; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आयुष्यात कधीही…”

“सातारच्या पराभवाची मनात सल”

दहापैकी सात उमेदवार विजयी झाल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, आज धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. आमचे अमर काळे हे वर्ध्यातून विजयी झाले आहेत. अमर काळे हे कमी बोलणारे पण सर्व लोकांना मान्य असलेले उमेदवार आम्ही दिले. तेही विजयी झाले आहेत. सात उमेदवार जनतेनं चांगल्या मतांनी विजयी केले आहेत. आम्हाला मनात सल आहे, की सातारचा पराभव आमचा निसटता पराभव आहे कारण पवार साहेबांना मानणारा सातारा जिल्हा आहे. पण थोडासा गहाळपणा झाला व आमची जागा तिथे पराभूत झाली. शशिकांत शिंदे पराभूत झाले याचं दुःख आम्हाला आहे. बीडची सीट अजून लढाई करतेय. रावेरमध्ये श्रीराम पाटील नवखे उमेदवार होते त्यांचा पराभव झाला आहे. आमच्या दहा उमेदवारांपैकी सात विजयी झाले. महाराष्ट्रातल्या त्या सगळ्याच भागातील जनतेचे मी आभार मानतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election result jayant patil ncp sharad pawar lost satara lok sabha seat css